नवी दिल्ली : मोसमी पावसाने सोमवारी मुंबईसह देशाच्या अनेक भागांमध्ये हाहाकार माजवला. आसाम राज्यातील पूरस्थिती कायम असून, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या डोंगराळ राज्यांमध्ये तसेच राजस्थानच्या वाळवंटातही अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्राने आसामला सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन केले. हेही वाचा >>> प्रादेशिक शांततेसाठी पूरक भूमिका! शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आसाममधील पूरस्थिती कायम असून, पुरात आतापर्यंत ६० जणांना जीव गमवावा लागला आहे. आसामच्या शेजारील अरुणाचल प्रदेशमध्येही मुसळधार पावसामुळे भूस्खलन तसेच पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तराखंडमधील संततधार पावसामुळे कुमाऊं प्रदेशातील नद्यांना पूर आला आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह ७० हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. ‘काझिरांगा’त १३१ वन्य प्राण्यांचा मृत्यूगुवाहटी पुरामुळे काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील सुमारे १३१ वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. तर ९६ प्राण्यांची सुटका करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. मृत प्राण्यांमध्ये ६ गेंडे, ११७ हरीण, दोन सांबर, एक रीसस मॅकाक (वानर) आणि एका पाणमांजराचा समावेश आहे.