नाशिक : कधीकाळी सैन्य दलाचे पंख म्हणून ओळखले जाणारे चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर उडत्या शवपेटय़ांमध्ये रुपांतरीत झाले आहेत. मागील सहा वर्षांत त्यांच्या अपघातात ३१ अधिकारी शहीद झाले. या जुनाट हेलिकॉप्टरचा ताफा कधी बदलला जाईल, आमच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण कोण करणार, असे प्रश्न लष्करी अधिकारी पत्नींच्या संघटनेने पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव हे शहीद झाले, तर सहवैमानिक गंभीररित्या जखमी झाले. या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी पंतप्रधानांना पत्र पाठवत विविध मुद्यांकडे लक्ष वेधले. या हेलिकॉप्टरचे उत्पादन फ्रान्सने १९८० मध्ये बंद केले. पाच दशके जुनी असणारी २०० हेलिकॉप्टर सैन्य दलाच्या ताफ्यात आहेत. अपघात वाढत असूनही ती सियाचीनसारख्या भागात आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यात वापरली जातात. त्यामुळे अधिकाऱ्यांचे कुटुंबीय तणावाखाली जगत आहेत. देशाचे रक्षण करणाऱ्या नायकांच्या सुरक्षेसाठी सेवारत अधिकाऱ्यांच्या पत्नींनी २०१४ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यात अ‍ॅड. मिनल वाघ-भोसले यांच्यासह वेगवेगळय़ा लष्करी विभागातील १४० अधिकाऱ्यांच्या पत्नींचा समावेश होता. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी जुनाट हेलिकॉप्टर बदलण्याचे आश्वासन दिले होते. तथापि दुर्देवाने पुढे काहीच झाले नसून परिस्थिती तशीच असल्याचे पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

‘मूलभूत अधिकारांचे रक्षण कोण करणार?’

कालबाह्य हेलिकॉप्टरने अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागत आहे. सुरक्षित उड्डाणासाठी तातडीने व्यवस्था होण्याची निकड आहे. अशा जुनाट हेलिकॉप्टर ताफ्याद्वारे सैनिकांचे रक्षण कसे करता येईल. आमच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण कोण करणार, असे प्रश्न उपस्थित करीत लष्करी अधिकारी पत्नी गटाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आयुर्मान संपुष्टात आलेली हेलिकॉप्टर तातडीने बदलण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.