Helle Lyng Norwegian journalist Facebook Instagram suspended : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर असून युरोपातील विविध देशांना भेटी देत आहेत. नॉर्वेतील भेटीदरम्यान नॉर्वेचे पंतप्रधान जोनस स्टोर यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या पत्रकार हेले लेंग स्वेन्सेन यांनी भारतीय प्रेस स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता त्यांचा हाच प्रश्न महागात पडला आहे. कारण, मेटाने त्यांचं इन्स्टाग्राम आणि फेसबूक अकाऊंटच निलंबित केलं होतं. त्यांनी एक्सवर यासंदर्भातील माहिती दिली होती. दरम्यान, त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट आता पुन्हा कार्यान्वित करण्यात आलं आहे.

एक्सवर पोस्ट करत लेंग यांनी सांगितलं की, त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट निलंबित होण्यापूर्वी संपूर्ण दिवस त्या ते वापरू शकत नव्हत्या. निलंबनाच्या कथित नोटीसचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी लिहिलं, “प्रेस स्वातंत्र्यासाठी (प्रेस फ्रीडम) मोजावी लागलेली ही एक छोटीशी किंमत आहे, पण मी यापूर्वी असा अनुभव कधीच घेतला नव्हता.”

दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिंग यांनी मेटा (Meta) मालकीच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजर्सना माहिती दिली की, त्यांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही अकाऊंट्स निलंबित करण्यात आले आहेत. त्यांनी मेटाला टॅग करत लिहिलं, “मला जास्तीत जास्त भारतीयांना उत्तरे द्यायची होती, परंतु आता माझ्या उत्तरांना उशीर होईल. मला आशा आहे की मला माझे अकाऊंट्स परत मिळतील.”

इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू

अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून मेटाशी संपर्क साधला. यानंतर त्यांचं अकाऊंट पुन्हा कार्यान्वित करण्यात आलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरी ठेवून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. त्या म्हणाल्या, तुम्ही पाठवलेल्या मेसेजसाठी मी तुमचे आभार मानते. तुमचा दृष्टीकोन मला आवडला. मी प्रत्येकाला लवकरच उत्तरं देईन. “

नेमका वाद काय?

“तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र प्रेसकडून काही प्रश्न का घेत नाही?” असं पंतप्रधान मोदी खोलीबाहेर जात असताना त्या ओरडून म्हणाल्या. मोदींनी हे ऐकले की नाही हे स्पष्ट झाले नसले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर लेंग यांनी एक्स (X) वर आपल्या कृतीचे समर्थन केले. पंतप्रधान मोदी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील अशी अपेक्षा नव्हती, असंही त्यांनी सांगितले. जागतिक प्रेस स्वातंत्र्य क्रमवारीचा (World Press Freedom Index) हवाला देत त्यांनी लिहिलं की, या यादीत नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे, तर भारत १५७ व्या स्थानावर आहे. हेल लेग या ओस्लो येथील ‘दगासाविसेन’ (Dagsavisen) या वृत्तपत्रासाठी काम करतात.

भारतीय दूतावासाचं उत्तर काय?

या प्रकरणावर सोशल मीडियावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्यानंतर, नॉर्वेमधील भारतीय दूतावासाने लेंग यांना त्याच दिवशी नंतर एका वेगळ्या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केले. त्या संवादादरम्यान त्यांनी भारताची विश्वासार्हता आणि मानवाधिकार रेकॉर्डशी संबंधित प्रश्न पुन्हा उपस्थित केले. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांनी भारताचा सांस्कृतिक इतिहास, बुद्धिबळ आणि योग यांसारखे योगदान आणि भारताच्या कोविड लस पुरवठा मोहिमेचा उल्लेख करत उत्तर दिले. तसंच, फारशा माहीत नसलेल्या स्वयंसेवी संस्थांचे ते अहवाल वाचतात आणि प्रश्न विचारतात. शतकानुशतके आमच्या येथे लोकशाही व्यवस्था आहे, असंही जॉर्ज यांनी स्पष्ट केलं.

सोशल मीडियावरील टीका आणि स्पष्टीकरण

या घटनेनंतर लेंग यांच्यावर सोशल मीडियावर तीव्र टीका झाली. अनेक युजर्सनी त्यांच्या चीन आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावरील जुन्या लेखांचा हवाला देत, त्या “परदेशी एजंट”, “हेर” (Spy) किंवा “चीनी प्रोक्सी” असल्याचा आरोप केला. तर काहींनी असा युक्तिवाद केला की, तो कार्यक्रम एक संयुक्त माध्यम संवाद होता, कोणतीही औपचारिक पत्रकार परिषद नव्हती.

टीका वाढल्यानंतर लेंग यांनी एक्सवर आणखी एक स्पष्टीकरण जारी केले. त्या म्हणाल्या, “मला असे लिहावे लागेल असे कधीच वाटले नव्हते, पण मी कोणत्याही परदेशी सरकारद्वारे पाठवलेली गुप्तहेर नाही. माझे काम केवळ पत्रकारिता आहे.” या सर्व वादानंतरही, सोशल मीडियावर लेंग यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. सोमवारपूर्वी एक्सवर त्यांचे ८०० पेक्षा कमी फॉलोअर्स होते, जे अवघ्या काही दिवसांत ४५,००० पेक्षा जास्त झाले.