Henley Passport Index 2026 : भारतीय पासपोर्ट हे नागरिकत्व सिद्ध करणारे दस्तऐवज मानलं जाऊ शकत नाही, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. त्यामुळे भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा नेमकं कोणता? यावरून सोशल मीडियावर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून आता वादविवाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच जगात भारतीय पासपोर्टची पत काय आहे? पासपोर्ट इंडेक्स काय सांगतो? याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात.

फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स २०२६ नुसार, भारत जगात ७५ व्या क्रमांकावर आहे. याआधी २०२५ मध्ये भारत जगात ८५ व्या क्रमांकावर होता. त्यामुळे २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये ही एक लक्षणीय सुधारणा आहे. जगभरातील पासपोर्टद्वारे मिळणाऱ्या प्रवासाच्या स्वातंत्र्याचं मोजमाप करणाऱ्या या निर्देशांकात भारताला व्हिसा-मुक्त श्रेणीत ५६ गुण मिळालेले आहेत.

त्यामुळे याचा अर्थ असा होतो की, भारतीय पासपोर्टधारक पूर्वपरवानगीने व्हिसा न घेता ५६ ठिकाणी प्रवास करू शकतात. यामध्ये अशा देशांचा समावेश आहे जिथे व्हिसा-मुक्त प्रवेश, व्हिसा-ऑन-अरायव्हल, व्हिजिटर परमिट किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन देणाऱ्या सुविधांचा समावेश आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

भारतीय पासपोर्टच्या रँकिंगमध्ये ऐतिहासिक सुधारणा

मागील काही वर्षांत जागतिक स्तरावर भारतीय पासपोर्टचं स्थान सातत्याने सुधारल्याचं पाहायला मिळत आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भारताचा क्रमांक ९० वा होता. त्यानंतर पासपोर्टच्या मानांकनात सुधारणा होऊन २०२३ मध्ये तो ८४ व्या आणि २०२४ मध्ये ८० व्या स्थानावर पोहोचला. मात्र, २०२५ मध्ये ८५ व्या स्थानावर घसरला. त्यानंतर २०२६ मध्ये भारतीय पासपोर्टच्या रँकिंगमध्ये ऐतिहासिक सुधारणा झाली. हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या २०२६ नुसार, भारत ७५ व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेनली पासपोर्ट इंडेक्स हे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माहितीचा वापर करून जगभरातील २२७ ठिकाणांवर मिळणाऱ्या प्रवेशाच्या आधारे पासपोर्टची क्रमवारी ठरवत असते. जेव्हा एखाद्या पासपोर्टधारकाला पूर्व-परवानगीशिवाय एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळतो, तेव्हा त्या पासपोर्टला गुण दिले जातात. यामध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश, व्हिसा-ऑन-अरायव्हल, व्हिजिटर परमिट किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन या सारख्या सुविधांचा समावेश असतो.

दरम्यान, २०२६ च्या क्रमवारीत सिंगापूरने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टचं आपलं स्थान कायम राखलं. या पासपोर्टद्वारे १९२ ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो. तसेच १८७ ठिकाणांवर प्रवेशासह जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर १८६ ठिकाणांवर प्रवेशासह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. या निर्देशांकात अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या स्थानावर असून या देशाच्या पासपोर्टद्वारे फक्त २४ ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवेश मिळतो.