हेन्ली पासपोर्ट इंडेक्सची (Henley Passport Index) आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. ऑन पेपर या रँकिंगमध्ये भारताची स्थिती काहीशी सुधारली आहे. मात्र जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष आकडेवारी पाहता, तेव्हा लक्षात येते की गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना आता व्हिसा-फ्री प्रवेश मिळणाऱ्या देशांची संख्या खरंतर कमी झाली आहे. २०२५ मध्ये भारत या रँकिंगमध्ये ८५व्या क्रमांकावर होता, तर २०२६ मध्ये भारताने १० स्थानांनी उडी घेतली असून भारताची रँकिंग आता ७५वी आहे.

या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भारताचे स्थान ८० वे होते, म्हणजे अवघ्या एका महिन्यात भारताने घेतलेली ही झेप खास आहे. मात्र लक्षात घेण्याची बाब म्हणजे, भारतीय पासपोर्टधारकाना सध्या व्हिसा फ्री प्रवेश करता येणाऱ्या देशांची एकूण संख्या ५६ आहे. ही संख्या जानेवारी २०२६ मधील ५५ च्या तुलनेत वाढली आहे, मात्र ती २०२५ मध्ये नोंदवलेल्या ५७ पेक्षा कमी आहे.

म्हणजेच भारतीयांना आता आणखी दोन देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करता येणार नाही आणि असे असून देखील भारत जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानावर पोहोचला आहे. एखादा पासपोर्ट रँकिंगमध्ये वर गेला, पण व्हिसा-फ्री एंट्रीच्या बाबतीत मागे आला, हे समजून घेण्यासाठी आपल्याला ‘हेन्लीपासपोर्ट इंडेक्स’ काय आहे हे समजून घ्यावे लागेल.

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स काय आहे?

हेन्ली अँड पार्टनर्सकडून ही रँकिंग प्रसिद्ध केले जाते. हेन्ली पासपोर्ट इडेक्समध्ये १९९ पासपोर्ट्सची २२७ वेगवेगळ्या ठिकाणांशी तुलना करत त्यांची रँकिंग ठरवली जाते. ही रँकिंग संबंधित पासपोर्टधारक व्हिसा न घेता किती देशांमध्ये जाऊ शकतो यावर ठरवली जाते.

ही रँकिंग इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या डेटावर आधारित आहे आणि त्याच्या स्कोअरिंग पद्धतीमध्ये व्हिसा-फ्री, व्हिसा ऑन अरायव्हल आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन यांचा समावेश आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, प्रवासासाठी आधी व्हिसा घेण्याची गरज नसलेल्या देशांची संख्या जितकी जास्त असेल तितका पासपोर्टचा मोबिलिटी स्कोअर जास्त होतो आणि पासपोर्ट अधिक शक्तिशाली ठरतो.

भारतीयांना या दोन देशात व्हिसा-फ्री प्रवेश बंद

२०२५ मध्ये भारतीय पासपोर्टधारकांना ५७ देशांमध्ये व्हिसा-फ्री (व्हिसा-ऑन-अरायव्हल आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशनसह) प्रवेश मिळायचा. २०२६ च्या सुरुवातीला हा आकडा ५५ वर (जानेवारी) आला आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये तो ५६ वर गेला. यादीतून दोन देश कमी झाले ते म्हणजे इराण आणि बोलिव्हिया.

नोव्हेंबर २०२५ मध्ये इराणने सामान्य भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा-फ्री प्रवेश स्थगित करण्यात आला आहे. बनावट नोकरीचे आमिष दाखवून भारतीय नागरिकांना इराणमध्ये बोलावून त्यांचे अपहरण करून खंडणी मागितल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर इराणने हा निर्णय घेतला. तर बोलिव्हियाने देखील भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा बंद करून ई-व्हिसा देणे सुरू केले आहे. येथे आता प्रवाशांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो, कागदपत्रे अपलोड करावी लागतात आणि प्रवासाला निघण्यापूर्वी मंजुरी मिळवणे बंधनकारक आहे मिळवणे अनिवार्य आहे.