Israel Hezbollah War Updates : इस्रायल-हमास युद्ध अद्याप शमलेलं नाही. अशातच आता इराणमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने इस्रायलची झोप उडवली आहे. हिजबुल्लाहने गुरुवारी (१३ जून) रात्री इस्रायलच्या अनेक सैन्य तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यामुळे मध्य-पूर्व आशियात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या हल्ल्यामुळे मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. हिजबुल्लाहने म्हटलं आहे की, “त्यांनी इस्रायली सैन्याचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. त्यांच्या तळांवर आम्ही ड्रोन आणि क्षेपणास्रं डागली आहेत.”

याआधी हिजबुल्लाहने बुधवारी रात्रीदेखील इस्रायलवर २०० क्षेपणास्रं डागली होती. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार इराणमधील या दहशतवादी संघटनेने गुरुवारी इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्रं डागली, तसेच इस्रायलच्या वेगवेगळ्या भागात ३० हून अधिक ड्रोन हल्ले केले. हिजबुल्लाहने दावा केला आहे की, त्यांनी केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्रं हल्ल्यात इस्रायली सैन्याचे नऊ तळ उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे इस्रायलचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

इस्रायली सैन्याने मंगळवारी (१२ जून) हिजबुल्लाहच्या काही तळांवर हल्ले केले होते. त्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर अबू ताबेब ठार झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिबजुबल्लाहने दोन दिवसांत इस्रायलवर ४०० हून अधिक क्षेपणास्रं डागली आहेत. “आम्ही आमच्यावरील हल्ल्याचा सूड घेण्यासाठी इस्रायलवर क्षेपणास्रं डागली”, असं हिजबुल्लाहने म्हटलं आहे. हिजबुल्लाने इस्रालयच्या गोलान हाईट्स येथील १५ सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याचं वृत्त अल जझीराने प्रसिद्ध केलं आहे.

मध्य-पूर्वेतील देश चिंतेत

७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झालेलं हे इस्रायल-हमास युद्ध आता नऊ महिने उलटले तरी चालूच आहे. युद्ध थांबण्याऐवजी अधिक दाहक होत चाललं आहे. त्यात आता या युद्धात हिजबुल्लाहने उडी घेतल्यामुळे मध्य पूर्वेतील देशांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, हिजबुल्लाहने इस्रायलवर क्षेपणास्र डागली असली तरी यापैकी बहुसंख्य क्षेपणास्रं इस्रायली हवाई दलाने रोखली आहेत.

हे ही वाचा >> Kuwait Fire Update : ४५ भारतीयांच्या मृतदेहांना घेऊन विशेष विमान भारताच्या दिशेने रवाना, कोची विमानतळावर रुग्णवाहिकेसह पोलीस तैनात!

दुसऱ्या बाजूला इस्रायलने मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्यात लेबनानी कमांडर ठार झाला होता. इस्रायलने दक्षिण लेबनान प्रांतात अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले होते. यात त्यांनी हिजबुल्लाहच्या अनेक तळांवर बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यात लेबनानी कमांडरचा मृत्यू झाल्यानंतर हिजबुल्लाह ही अतिरेकी संघटना चवताळली आणि त्यांनी इस्रायलवर अंधाधुंद क्षेपणास्रे डागली, ड्रोन हल्ले देखील केले.