राजधानी दिल्लीतील जामियानगर येथे सुधारित नागरिकत्व कायद्या(सीएए)विरोधात सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान एका तरुणाने गोळीबार केला. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. तर गोळीबार करणाऱ्या अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असुन त्याची ओळख देखील पटली आहे. भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी त्याला त्याच्या कपड्यावरून ओळखा असं ओवेसींनी म्हटलं आहे.

याचबरोबर ओवेसींनी केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर देखील टिप्पणी केली आहे. ”अनुराग ठाकूर आणि सर्व राष्ट्रवाद्यांना धन्यवाद, ज्यांनी एवढा या देशाता एवढा द्वेष निर्माण केला की, एका दहशतवाद्याने पोलिसांसमोर विद्यार्थ्यावर गोळीबार केला. पंतप्रधान मोदी त्याला त्याच्या कपड्यावरून ओळखा.” असं ओवेसींनी ट्विट केलं आहे.

या अगोदर ओवेसी यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांच्या दिल्ली येथील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना “मी अनुराग ठाकूर यांना आव्हान देतो की, त्यांनी मला भारतातील त्या जागेचं नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत. मी तिथे येण्यास तयार आहे”. असं म्हटलं होतं. तुमच्या वक्तव्याने माझ्या मनात कोणतीही भीती निर्माण होणार नाही. कारण आमच्या माता आणि भगिनी देश वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत”. असं देखील ओवेसी म्हणाले होते.