Hidden Treasure News in Rajasthan: पुराणकाळातील सोनं, दागदागिने, हिरे किंवा मोठा खजिना कुठेतरी लपवून ठेवलाय या शक्यतेवर किंवा अफवेवर विश्वास ठेवून अनेक ठिकाणी असंख्य कथा रचल्या गेल्या. काही ठिकाणी त्यांनी अंधश्रद्धांचंदेखील रूप घेतलं. अजूनही अशा कथा गावागावांतून चवीनं ऐकवल्या आणि ऐकल्याही जातात. पण जर कधी खरंच एखादा जुना घडा सापडला तर मात्र त्या खऱ्या आहेत की काय असा संशय येऊ लागतो. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातल्या सीदरा गावात शनिवारी असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. आख्खा गाव त्या एकाच ठिकाणी लोटलं होतं. शिवाय बरंच खोदकाम केल्यानंतर तब्बल दोन फूट उंचीचा एक भलामोठा घडा प्रशासनाला सापडला!

जयपूरपासून दक्षिणेला दोन तासांच्या प्रवासाच्या अंतरावर असणाऱ्या सीदरा गावात गेल्या आठवड्यात शनिवारी हा सगळा प्रसंग घडला. गावातल्या एका मोकळ्या जागेवर गुलाबाच्या पाकळ्या, अगरबत्त्या, धूप आणि प्रार्थनेचं इतर काही साहित्य दिसन आलं. बैलं चरायला रानावर घेऊन गेलेल्या काही ग्रामस्थांना हा प्रकार दिसला आणि त्यांनी इतर गावकऱ्यांना त्याची माहिती दिली. बघता बघता आख्खा गाव गोळा झाला. कानोकान खबर पोहोचली आणि चक्क जिल्हा मुख्यालयातील अधिकारी मंडळीदेखील गावात दाखल झाली. प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत त्यांनी तो सगळा प्रकार पाहिला.

सोनं, खजिना की आणखी काही?

एकीकडे गावकऱ्यांमध्ये कुजबूज होती की त्या ठिकाणी खोल जमिनीत मोठा सोन्या-चांदीचा खजिना दडवून ठेवला आहे. पण त्याचवेळी इतर काही ग्रामस्थ काहीतरी काळंबेरं असून तिथे एखादा मृतदेह पुरून ठेवला असावा, अशी शंका व्यक्त करत होते. जिल्हा प्रशासनानं थेट जेसीबीच मागवला आणि त्या ठिकाणी खणायला सुरुवात केली. नेमकं तिथे खाली काय आहे? याविषयीची उत्सुकता आणि प्रशासन म्हणून कर्तव्यदेखील होतंच!

…आणि तो घडा सापडला!

शनिवारी संध्याकाळी ही कथित खजिन्याची शोधमोहीम सुरू झाली. यंत्रसामग्रीच्या साहाय्याने खोदकाम केलं गेलं. काही तास खणल्यानंतर जेसीबीला काहीतरी लागल्याचा आवाज झाला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लागलीच पुढे सरसावून अदमास घेण्याचा प्रयत्न केला. खाली उतरलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं त्यावर कुणाचा विश्वास बसेना! इतक्या मेहनतीनं खोदकाम केल्याचं सार्थक होणार असं प्रत्येकालाच वाटलं. कारण खाली तब्बल दोन फूट उंचीचा एक पूर्ण भरलेला घडा होता! पण त्या घड्यामध्ये नेमकं होतं तरी काय?

जेसीबीच्या सहाय्याने तो घडा वर आणण्यात आला. गावकऱ्यांनी एकच आरोळी दिली की घड्यामध्ये सोनं आहे. सगळे गावकरी त्या घड्याभोवती गोळा झाले. प्रत्येकाला सोनं बघायची उत्सुकता होती. पण खरंच आत सोनं आहे की काय, हे मात्र समजायला मार्ग नव्हता. घड्यावर पूर्णपणे माती पसरलेली होती. गावकरी घड्याचं नुकसान करू शकतात या भीतीने शेवटी एक अधिकारी थेट त्या घड्यावरच पाय ठेवून उभा राहिला.

गावकऱ्यांनी काय पाहिलं?

घड्यात नेमकं ग्रामस्थांना काय दिसलं? याविषयी काही गावकऱ्यांनी आपापल्या कथा सांगितल्या. भूरी देवी नावाच्या महिला गावकऱ्याने सांगितलं, “त्यात पिवळ्या रंगाच्या एखाद्या साबणाच्या आकाराच्या विटा होत्या. गावकरी जमायला लागले तसं पोलिसांनी गर्दीला लाठीहल्ला करून पांगवलं. पण पोलीस अधिकारी मात्र त्या घड्यावर पाय ठेवून उभा होता.”

भंवरपाल नावाच्या दुसऱ्या एका ग्रामस्थाने सांगितलं की, “मीही पिवळ्या रंगाच्या विटा पाहिल्या. शिवाय, त्या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या आणि अगरबत्त्यांचा वास होता.” यानंतर स्थानिक तहसीलदार नरेश गुर्जर यांनी सदर घडा प्रशासनाने ताब्यात घेतला असून सरकारी कार्यालयात कुलुपबंद करून ठेवला आहे, त्यावर सील लावण्यात आलं आहे असं सांगितलं.

अफवा आणखी वेगाने पसरली आणि गावकरी खड्ड्याकडे धावले!

प्रशासनाने सापडलेला घडा कुलूपबंद करून त्यावर सीलदेखील लावल्यामुळे गावकऱ्यांची पक्की खात्रीच पटली की त्या खड्ड्यात खजिना सापडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी लागलीच खड्ड्याकडे धाव घेतली. रात्रभर गावकरी त्या खड्ड्यात आणखी खोल खणत राहिले. त्यांना अपेक्षा होती की खड्ड्यात आणखीही धन सापडेल. पण त्यांच्या हाती काहीही लागलं नाही.

जप्त केलेल्या घड्याचं काय झालं?

इकडे गावकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नसलं, तरी तिकडे जप्त केलेल्या घड्यानं मात्र निराशा केली नाही. पण जे सापडलं ते सोनं किंवा कोणता खजिना नक्कीच नव्हता. सोमवारी सकाळी पुरातत्व खात्याचे अधिकारी अजमेरहून खास त्या घड्याची तपासणी करण्यासाठी दाखल झाले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांनी कार्यालयात सीलबंद ठेवलेला घडा बाहेर काढला. उत्सुकतेनं त्याच्या तोंडाशी जमलेली माती बाजूला काढायला सुरुवात केली. काही वेळानंतर त्यांची खात्री पटली की घड्यात फक्त मातीशिवाय दुसरं काहीही नाही!

rajasthan hidden treasure case
गुप्त धन फसवणूक प्रकरणी राजस्थानमध्ये दोघांना अटक (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

खरा प्रकार काहीतरी वेगळाच होता!

दरम्यान, या सगळ्या प्रकाराचा तपास केल्यानंतर खरी गोष्ट स्पष्ट झाल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला आहे. या तपासाच्या आधारावर पोलिसांनी अशा प्रकारे खोट्या गोष्टी पसरवणाऱ्या ‘कॉन आर्टिस गँग’च्या दोन सदस्यांना अटकदेखील केली. स्थानिक पोलीस अधीक्षक रवी प्रकाश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गँगचे सदस्य अशा प्रकारच्या गुप्त धनाविषयी गावकऱ्यांमध्ये अफवा पसरवतात आणि त्याच्या माहिती देण्याच्या बदल्यात स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात. त्यानुसार, पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून फक्त सोन्यासारख्या दिसणाऱ्या पण प्रत्यक्षात पितळी विटाही जप्त केल्या.

काय आहे या टोळक्याची मोडस ऑपरेंडी?

“मुकेश मीना (३२) व अभिषेक मीना (२४) या दोन स्थानिक तरुणांना अटक केली आहे. मुकेशने ‘तत्काल अघोरी महाराज’ नावाचं एक फेसबुक पेजही चालू केलं आहे. या दोघांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार, या टोळीचे काही सदस्य स्वत:च अशा प्रकारचे घडे जमिनीत खोलवर पुरून ठेवतात. त्यानंतर लोकांना खजिना असल्याचं सांगतात. त्याबदल्यात पैसे घेतात. मग ते लोकांना त्या ठिकाणी घेऊन जातात आणि तिथे पूजा करतात. नंतर खोदकाम करायला सांगून तिथून स्वत:च पुरलेला घडा ग्रामस्थांना सापडेल अशी व्यवस्था करतात”, अशी माहिती अधीक्षक रवी शर्मा यांनी दिली.

त्यामुळे खरं सोनं किंवा खजिना प्रत्यक्षात कुठे अस्तित्वात आहे की नाही? याविषयी कुठलीच खात्री नसताना अशा टोळक्यांना मात्र अशा फसवाफसवीतून आणि लोकांना लुटून मोठं घबाड वेळोवेळी हाती लागत असल्याचं या प्रकारामुळे अधोरेखित झालं!