पीटीआय, नवी दिल्ली राजधानी दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरातील तीन यूपीएससी उमेदवारांच्या मृत्यूबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी अधिकाऱ्यांना फटकारले. ‘मानवी जीव मूल्यवान आहे. कोणत्याही निष्काळजीमुळे ते गमावता कामा नये. प्रशासनाकडे वेतन देण्यासाठी पैसे नसतात, तेव्हा ते शतकानुशतके जुन्या पायाभूत सुविधा अद्यायावत कशा करणार, असा सवाल करत मोफत संस्कृती संपवणे आवश्यक असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी अधोरेखित केले. २७ जुलै झालेल्या या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी ‘कुटुंब’ संघटनेने वकील रुद्र विक्रम सिंग यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हेही वाचा >>>विकास दिव्यकीर्तींनंतर आता खान सर यांच्या कोचिंग सेंटरवरही कारवाईचा बडगा; नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका! जुन्या राजेंद्र नगरमधील कोचिंग सेंटरच्या बाहेर कार चालवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दिल्ली पोलिस कारवाई करून विचित्र चौकशी करत आहेत. परंतु महापालिका अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई करत नाही. दिल्ली पोलिस नेमके काय करत आहेत, अशी टिप्पणीही खंडपीठाने केली. उच्च न्यायालयाने सीव्हीसी, सीबीआय किंवा लोकपाल यासारख्या केंद्रीय संस्थांना या घटनेची चौकशी करण्याच्या सूचना केल्या. तसेच दिल्ली महापालिकेचे (एमसीडी) आयुक्त, संबंधित पोलिस उपायुक्त आणि या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांना शुक्रवारी हजर राहण्याचे निर्देश दिले. हेही वाचा >>>Kangana Ranaut on Rahul Gandhi: “पास्ता विथ कडीपत्ता…”, राहुल गांधींच्या जात प्रकरणात खासदार कंगना यांची उडी; म्हणाल्या, “स्वतःची जात…” हे सर्वांचे अपयश! जुन्या राजेंद्र नगर भागातील शिकवणी केंद्रात शनिवारी झालेल्या दुर्घटनेला नागरी संस्थाच जबाबदार असल्याची कबुली देत येथे गंभीर संरचनात्मक त्रूटी आहेत, त्यांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिल्ली महानगरपालिकेचे (एमसीडी) अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांनी बुधवारी सांगितले. जामीन याचिका फेटाळल्या तळघरातील मृत्यू हा गुन्हा गंभीर असल्याचे नमूद करून दिल्ली न्यायालयाने बुधवारी एसयूव्ही चालकाची जामीन याचिका फेटाळून लावली. तसेच या घटनेचा तपास अद्याप सुरू असल्याचे सांगत न्यायालयाने तळघराचे चार सह-मालक तेजिंदर सिंग, परविंदर सिंग, हरविंदर सिंग आणि सरबजीत सिंग यांचे जामीन अर्जही फेटाळून लावले.