एका सज्ञान मुलीला तिची इच्छा नसताना पालकांसोबत राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. स्वतःचे राहण्याचे ठिकाण आणि सोबत कोण असावे हे निवडण्याचा अधिकार प्रत्येक सज्ञान व्यक्तीला आहे; त्यामुळे तिच्या स्वातंत्र्याचा आणि निर्णयाचा सन्मान झालाच पाहिजे, असे स्पष्ट करत न्यायालयाने एका आईची याचिका फेटाळून लावली.

काय आहे नेमकं प्रकरण?

एका महिलेने आपल्या २५ वर्षांच्या मुलीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश द्यावेत, यासाठी ‘हेबियस कॉर्पस’ म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य प्रशासनाने मुलीला न्यायालयात हजर केले.

न्यायाधीशांशी झालेल्या थेट संवादादरम्यान मुलीने स्पष्ट केले की, ती दिल्लीत स्वेच्छेने आणि स्वतंत्रपणे राहत आहे. तिने कोणाच्याही बेकायदेशीर ताब्यात असल्याचा आरोप फेटाळून लावला. “आईची माझ्यासोबतची वागणूक अत्यंत वाईट होती. मला घरात सातत्याने मारहाण आणि शिवीगाळ सहन करावी लागत होती, त्यामुळे मला आईसोबत राहायचे नाही,” असा गंभीर आरोप मुलीने न्यायालयात केला. दुसरीकडे, आईने हे सर्व आरोप फेटाळत मुलीने घरी परत यावे, अशी मागणी केली.

‘स्वतःचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य’

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “एखादी व्यक्ती केवळ जन्मदाते आई-वडील आहे म्हणून तिच्या सज्ञान मुलाला मनाविरुद्ध सोबत राहण्यास भाग पाडू शकत नाही. मुलगी सज्ञान आणि सुजाण आहे. तिने स्वतःच्या इच्छेने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.”

न्यायालयाने हेबियस कॉर्पस याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले की, कायदा सज्ञान व्यक्तीला तिच्या आवडीच्या ठिकाणी आणि आवडीच्या व्यक्तीसोबत राहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो. पालकत्वाच्या नावाखाली एखाद्या सज्ञान व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही, यावर न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ आणि ‘लाइव्ह लॉ’ यांनी दिले आहे.