US Iran War : अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी आता हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला. पण अमेरिकेच्या प्रस्तावातील अटी पाहता इराणने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि स्वत:च्या पाच अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. मात्र, इराणच्या अटी अमेरिकेला मान्य नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका व इराण यांच्यात सलोखा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला असून दोन्ही देशांमध्ये पाकिस्तान मध्यस्थी करत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन दिवस उच्चस्तरीय बैठका पार पडणार आहेत. या बैठकीत सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त हे देशही सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत युद्धाबाबत काय तोडगा काढला जातो? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत म्हटलं की, या दोन दिवसीय बैठकीत चारही देशांचे परराष्ट्र मंत्री आखाती राष्ट्रांमधील तणाव कमी करण्याच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं की, “तणाव कमी करण्यासाठी एक योजना स्थापित करणं आणि संभाव्य राजनैतिक योजनेचं मूल्यांकन करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. या युद्धाबाबत काय वाटाघाटी होतात आणि परिस्थितीचे मूल्यांकन कसे होते व काय करता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत.”

कोणते चार देश चर्चेत सहभागी होणार?

इस्लामाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री सहभागी होणार आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार हे या राजनैतिक चर्चेचं नेतृत्व करत आहेत. दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्याच्या राजनैतिक प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या बैठकीपूर्वी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

अमेरिकेच्या शांतता प्रस्तावात काय अटी आहेत?

-इराण समर्थन देणाऱ्या बंडखोरांना अप्रत्यक्ष रणनीती आणि या गटांना निधी व शस्त्रे पुरवणं थांबवावं.
-नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणुसुविधा देखील इराणने बंद कराव्यात.
-इराणच्या क्षेपणास्त्रांची संख्या, पल्ला आणि त्यांचा वापर मर्यादित करावा.
-इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा.
-होर्मुझ खुली केल्यास तेहरानवरील सर्व निर्बंध उठवले जातील आणि बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्यांना मदतही केली जाईल.

इराणने कोणत्या पाच अटी ठेवल्या?

-युद्धातील नुकसान भरपाईची हमी.
-आक्रमण आणि हत्या तात्काळ थांबवणं.
-इराणविरुद्ध युद्धाची पुनरावृत्ती रोखणारी ठोस हमी.
-इराणविरुद्ध संपूर्ण प्रदेशातील सर्व प्रतिकार गटांविरुद्धच्या युद्ध समाप्ती.
-होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या सार्वभौमत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता.