पीटीआय, नवी दिल्ली, श्रीनगर
लाल किल्ल्याजवळ झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच होता, असे निष्पन्न झाल्याने या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. स्फोट घडविण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा चालक हा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील डॉक्टर होता. ही गाडी फरिदाबादवरून आली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी उजेडात आणलेल्या उच्चशिक्षित ‘व्हाइट कॉलर’ दहशतवादी प्रारूपाशी या स्फोटाचा थेट संबंध असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सोमवारी संध्याकाळी स्फोट झालेल्या ह्युंदाई आय२० वाहनाचा चालक डॉ. उमर नबीचा मृतांमध्ये समावेश असल्याचे मानले जात आहे. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या अवयवांशी जुळण्यासाठी नबीच्या आईचा डीएनए नमुना घेतला, असे श्रीनगरमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.
हा बॉम्बस्फोट असल्याचे दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याचे (यूएपीए) कलम १६ (दहशतवादी कायद्यांसाठी शिक्षा) आणि कलम १८ (कट रचण्यासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच भारतीय न्याय संहितेच्या स्फोटके कायद्याच्या कलम १०३(१) (हत्या), १०९(१) (हत्येचा प्रयत्न) आणि १६१(२) (वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला) या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान येथे दिला आहे.
तपास यंत्रणांनी दहशतवादी हल्ला विचारात घेऊन तपास सुरू केला असला तरी, केंद्र सरकारने तसे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यादृष्टीने केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीची चक्रे फिरू लागली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी याप्रकरणी विविध तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सलग आढावा बैठका घेतल्या.
तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उमर घाबरला असावा म्हणून कारमधील स्फोटकांचा अपघाती स्फोट होण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. उमर लाल किल्ल्याजवळील सुनहरी मशीद पार्किंगमध्ये जवळजवळ तीन तास वाट पाहत होता आणि फरिदाबादमध्ये त्याच्या साथीदारांच्या अटकेबाबत इंटरनेटवर माहिती घेत होता. अधिकाऱ्यांना उमरच्या गाडीचा ११ तासांचा माग काढण्यातही यश आले आहे.
स्फोटावेळी वाहनात किती जण होते हे स्पष्ट झालेले नाही. प्रारंभी तीन जण असल्याचा दावा करण्यात आला होता, तर अन्य एका वृत्तानुसार फरिदाबाद दहशतवादी प्रारूप उघड झाल्यावर एकटा उमरच पळून गेला होता.
सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी सुमारे ६.५२ वाजता, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ आणि ४ दरम्यानच्या सिग्नलवर उभ्या असलेल्या हुंदई आय-२० कारमध्ये प्रचंड स्फोट झाला. स्फोटामुळे नजिक उभी असलेल्या अनेक वाहनांना आगी लागल्या व त्यात ती वाहने खाक झाली. आसपासची दुकाने व इमारतींच्या काचाही फुटल्या.
आतापर्यंत तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली होती आणि २,९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. सोमवारी अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. मुझम्मिल गनी आणि डॉ. शाहीन सईद यांचा समावेश आहे. हे दोघेही फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाशी संबंधित होते. तेथून ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. शाहीन भारतात जैश-ए-मोहम्मदच्या महिला विभागाचे नेतृत्व करत होती.
प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसते की, स्फोटात अमोनियम नायट्रेट आणि डिटोनेटरचा वापर केला गेला असावा. पुलवामा जिल्ह्यातील तारिक नावाच्या व्यक्तीने उमरला आय२० वाहन दिले होते त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस, एनआयए आणि गुप्तचर संस्थांच्या पथकांनी दिल्ली आणि काश्मीरमध्ये छापे टाकले आहेत. काश्मीरमध्ये चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हल्ला दहशतवादीच?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी याप्रकरणी विविध तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सलग आढावा बैठका घेतल्या. पहिली बैठक मंगळवारी सकाळी ११ वाजता शाह यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला गृहसचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, ह्यएनआयएह्णचे महासंचालक सदानंद दाते आणि दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोल्छा उपस्थित होते. जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुख नलिन प्रभात हेही या बैठकीत ऑनलाइन सहभाग झाले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजता कर्तव्य भवनात गृह मंत्रालयाच्या कार्यालयात आणखी एक आढावा बैठक झाली. ही बैठक दोन तासांहून अधिक काळ सुरू होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या प्रकरणाचा तपास ह्यएनआयएह्णकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार ही घटना दहशतवादी हल्ला असल्याचे मानूनच चौकशी करत असल्याचे स्पष्ट झाले. ह्यएनआयएह्ण ही केंद्रीय तपास यंत्रणा प्रामुख्याने दहशतवादाशी निगडित प्रकरणांचा तपास करते.
अनेक शतकांपासून भारत आणि भूतानचे दृढ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी मी वचनबद्ध होतो. पण आज मी येथे जड अंत:करणाने आलो आहे. दिल्लीतील भयावह घटनेने सगळ्यांनाच दु:खी केले आहे. आमच्या तपास संस्था या कटाच्या मुळाशी जातील. कटाच्या सूत्रधारांना सोडणार नाही.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
