वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अल् कायदा या दहशतवादी संघटनेच्या अस-सहाब मीडिया या मुखपत्राद्वारे अल कायदाचा प्रमुख अयमान जवाहिरी याची नऊ मिनिटांची चित्रफीत मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात त्याने भारतात हिजाबप्रश्नी सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. त्याने भारतीय उपखंडातील मुस्लिमांनी एकत्र येऊन इस्लामवर होत असलेल्या हल्ल्यांवर बौद्धिक, तार्किक, प्रसारमाध्यमांद्वारे किंवा रस्त्यावर उतरून सशस्त्र प्रतिहल्ल्याचे आवाहन केले आहे.

भारतातील ताज्या घडामोडींवर जवाहिरीने या चित्रफितीद्वारे केलेले भाष्य पाहता, तो जिवंत असल्याचा पुरावाच मानला जात आहे. त्याचा आजारपणामुळे २०२० मध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त होते. परंतु त्यानंतरही अल कायदाद्वारे जवाहिरीच्या अनेक चित्रफिती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यात तो इतिहासातील संघर्ष, विचारधारांचा संघर्ष आदी विषयांवर बोलल्याने त्या चित्रफिती ताज्या असण्याबाबत साशंकता होती. मात्र, जवाहिरीच्या नव्या चित्रफितीत त्याने भारतातील ताज्या घडामोडींवर आपले मत प्रदर्शित केले आहे. 

कर्नाटकमध्ये चिघळलेल्या हिजाबप्रश्नावरील वादावर तेथील मुस्लिम विद्यार्थिनी मुस्कान खान हिने हिंदू आंदोलकांनी घेरले असतानाही ‘अल्ला हु अकबर’ असे नारे निर्भयपणे दिले. तिचे जवाहिरीने या चित्रफितीत कौतुक केले आहे. आपल्या नाऱ्यांद्वारे हिंदू बहुईश्वरवाद्यांच्या टोळीला तिने उघड आव्हान दिले. तिच्या या कृत्याने मुस्लिम समाज पुन्हा जागृत झाला असून, जिहाद (धर्मयुद्ध) अधिक प्रबळ झाला आहे.  जवाहिरीने या चित्रफितीत सांगितले, की भारतातील हिंदू लोकशाहीच्या मृगजळाला मुस्लिमांनी भुलू नये. इस्लामला दाबून टाकण्याचे ते एक अस्त्र आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की या वास्तव जगात ‘मानवी हक्क’ किंवा ‘संविधानाचा आदर’ किंवा कायदा अशा निर्थक मूर्ख कल्पनांना स्थानच नाही. पाश्चिमात्य जगाने मुस्लिमांविरुद्ध केलेला फसवणुकीचा कट असून, तो आता भारतात आला आहे.  फ्रान्स, हॉलंड आणि स्वित्र्झलड या देशांनी एकीकडे नग्नतेला मुभा देताना हिजाबला बंदी घातली आहे, हे याचे धडधडीत उदाहरण आहे. इस्लामचे हे सर्व शत्रू एकच असल्याचे जवाहिरी म्हणाला.

भारतीय सुरक्षादलांकडून गंभीर दखल!

या चित्रफितीची भारतीय सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतली आहे. एका सुरक्षा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की जवाहिरी भारतातील या एकाच मुद्दय़ावर दीर्घ काळ बोलला आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अल कायदा ही दहशतवादी संघटना आपल्या सदस्य भरतीसाठी भारताला अनुकूल प्रदेश मानतो. भारतातील असंतुष्ट मुस्लिमां आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही संघटना सर्वतोपरी प्रयत्न करेल. आपल्या कार्यकर्त्यांच्या फळीला प्रेरणा देऊन हिंसक कृत्यासाठी त्यांना प्रोत्साहित करेल.

मुस्कानच्या पित्याची टीका

अल कायदा प्रमुख अयमान जवाहिरीने कर्नाटकमधील विद्याथिनी मुस्कान खान हिचे कौतुक केल्यानंतर तिच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया देत जवाहिरीचे विधान अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले. आम्ही भारतात आनंदात आणि शांततेत राहत असून आम्हाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. जवाहिरी कोण आहे याबाबत आम्हाला काहीच माहिती नसून आज टीव्हीवर चित्रफितीद्वारे प्रथमच त्याला पाहिले. आम्ही भारतात बंधुत्वाच्या आणि प्रेमाच्या नात्याने राहत या चित्रफितीद्वारे आमच्यात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मोहम्मद हुसेन खान यांनी सांगितले.