scorecardresearch

Hijab Row : “आमचा गणवेश महत्त्वाचा आहे की…?” न्यायालयाच्या निर्णयावर याचिकाकर्त्या विद्यार्थिनींचा संतप्त सवाल!

“हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही” असं म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थिनींची मागणी फेटाळून लावली आहे.

hijab row karnataka high court verdict
हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर याचिकाकर्त्या विद्यार्थिनींची संतप्त प्रतिक्रिया!

गेल्या तीन महिन्यांपासून देशभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या हिजाबच्या मुद्द्यावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचं नमूद करतानाच न्यायालयाने विद्यार्थी गणवेशाला नकार देऊ शकत नाहीत, असं देखील म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या असून याचिकाकर्त्या विद्यार्थिनींनी यासंदर्भात सरकारला संतप्त सवाल केला आहे. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या विद्यार्थिनींनी सरकारला याबाबत जाब विचारला आहे.

यासंदर्भात याचिकाकर्त्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांकडून वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचं नमूद केलं आहे. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्या विद्यार्थिनींनी पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयाच्या निकालावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

“…तर बाबासाहेब आंबेडकर रडले असते”

“मला कळत नाहीये की काय बोलावं. आत्ता आम्ही मानसिकदृष्ट्या खच्ची झालो आहोत. आम्ही आमच्या देशापासून, आमच्या राज्यघटनेपासून खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते, तर ते ही परिस्थिती पाहून रडले असते”, असं एका विद्यार्थिनीने म्हटलं आहे.

Hijab Verdict : हा निकाल म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्यांना चपराक- उज्वल निकम

“आमचं शिक्षण महत्त्वाचं आहे की आमचे गणवेश? मी आपल्या सरकारला प्रश्न का विचारू शकत नाही? आमच्या शिक्षणापेक्षा त्यांच्यासाठी आमचा गणवेश महत्त्वाचा आहे का? सरकार आम्हाला अशिक्षित ठेवत आहे. सरकार आम्हाला शिकू देत नाहीये. आम्हाल घरीच थांबायला भाग पाडत आहे. ते आम्हाला अशिक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या धर्माचं आणि संस्कृतीचं पालन करणं ही आमची इच्छा आहे”, अशा शब्दांत या विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Hijab Row: हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

परीक्षा द्यायला तयार, पण…

दरम्यान, हिजाब घालूनच परीक्षा देणार असल्याचं या विद्यार्थिनींनी स्पष्ट केलं आहे. “आम्ही परीक्षा द्यायला तयार आहोत. आम्ही स्वत:च आमच्या परीक्षांची तयारी करत आहोत. कारण गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही वर्गात बसत नाही आहोत. आम्हाला परीक्षा द्यायची आहे. पण हे आता सरकारवर आणि आमच्या कॉलेजवर अवलंबून आहे की त्यांनी आम्हाला हिजाब घालूनच परीक्षेला बसू द्यायचं की नाही. आम्हाला हिजाब घालूनच वर्गात प्रवेश करायचा आहे आणि परीक्षा द्यायची आहे. त्यासाठीच आम्ही ही याचिका दाखल केली आहे”, असं या विद्यार्थिनींनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hijab verdict by karnataka high court petitioner girls gets angry over government pmw