आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. आपले बालपणीचे स्वप्न साकार होत असल्याचे या प्रसंगी हिमाने सांगितले. माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा दासला नियुक्ती पत्र दिले. राज्य शासनाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिस महासंचालकांसह, पोलिस विभागातील इतर अधिकारीही समारंभाला उपस्थित होते.

डीएसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर झालेल्या समारंभाला संबोधित करताना २१ वर्षीय हिमाने सांगितले की, तिने लहान असताना पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते.

“इथल्या लोकांना माहित आहे आणि मी काही वेगळे बोलणार नाही. माझ्या शाळेच्या सुरुवातीच्या काळापासून, मी एक दिवस पोलिस अधिकारी बनण्याची इच्छा बाळगली होती आणि माझ्या आईची पण हीच इच्छा होती. “माझी आई दुर्गापूजेच्या वेळी खेळण्यातली एक बंदूक खरेदी करायची, मला आसाम पोलिसांसाठी काम करण्यास सांगायची, लोकांची सेवा करून एक चांगली व्यक्ती होण्यासाठी सांगायची.”

ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेती हिमाने सांगितले की, राज्य पोलिसमधल्या नोकरीबरोबरच आपण खेळातही उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणे सुरूच ठेवणार आहोत.

ती म्हणाली, “मला खेळामुळे सर्वकाही मिळाले, मी राज्यातील खेळाला सुधारण्याच्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करेन आणि आसामला हरियाणाप्रमाणे देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य बनवण्याचा प्रयत्न करेन”. याप्रसंगी सोनोवाल म्हणाले की, हिमाची डीएसपी म्हणून नियुक्ती केल्याने इतर तरुण खेळांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित होतील.