Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये एका आरोग्य योजनेवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे. हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हिमकेअर आरोग्य योजनेवरून मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

पुरूषांना गर्भाशयाच्या शस्त्रक्रियांची बिलं दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. हिमकेअर योजनेतील भ्रष्ट्राचाराची चौकशी विद्यमान न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हिमकेअर (HimCare) ही हिमाचल प्रदेश सरकारची प्रमुख आरोग्य योजना आहे.

दरम्यान, ‘हिमकेअर’आरोग्य योजनेतील कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्या आरोपांना मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी उत्तर दिलं. पण यावेळी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस सरकार ही योजना मोडीत काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी केला, तर या आरोपांना मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी अंतर्गत लेखापरीक्षणाच्या निष्कर्षांचा हवाला देत सरकारचा बचाव केला.

न्यायालयीन चौकशीची मागणी

विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी आरोप केला की हे सरकार ‘दुरुस्ती’च्या नावाखाली आरोग्य योजना बंद करण्याच्या कृतीचं समर्थन करण्यासाठी दिशाभूल करणारी आकडेवारी देत आहे. मात्र, मागील भाजपा सरकार आणि सध्याचं काँग्रेस सरकार या दोन्ही सरकारच्या काळात हिमकेअर आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जयराम ठाकूर यांनी केली.

तसेच जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांचे मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराचे दावे फेटाळून लावले. ठाकूर म्हणाले की, “भाजपाच्या कार्यकाळात या योजनेवर एकूण ४४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मग जर एकूण खर्च ४४१ कोटी रुपये होता तर १,१०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? हे पूर्णपणे खोटं आणि दिशाभूल करणारे आरोप आहेत.”