देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असताना एक दिलासादायक बातमी आहे. देशात करोनाविरुद्ध १०० टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. यासंदर्भात राज्याच्या एका अधिकृत प्रवक्त्याने शनिवारी दावा केला आहे. राज्यात तब्बल ५३,८६,३९३ पात्र लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ऑगस्टच्या अखेरीस पात्र १०० टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले होते, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी बिलासपूर येथील ऑल-इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे करोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी लसीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, असं त्यांनी सांगितलं.

राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्वीट करून जनतेचं अभिनंदन केलंय. “आज आपल्या हिमाचलने आणखी एक इतिहास रचत देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पात्र नागरिकांना कोविड लसीचा दुसरा डोस देऊन हिमाचलने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील सर्व जनतेचे हार्दिक अभिनंदन आणि आरोग्य विभाग/टीमचे आभार,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजीव सैजल हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील, असेही ते म्हणाले.  

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himachal pradesh becomes first fully corona vaccinated state hrc
First published on: 05-12-2021 at 10:50 IST