हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात मंगळवारी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगात असलेली एक मारुती स्विफ्ट कार टायर फाटल्याने थेट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळताच कारने पेट घेतला, ज्यामध्ये दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. ही घटना भरवाईन-होशियारपूर मार्गावर घडली असून, हा रस्ता त्याच्या तीव्र उतारासाठी आणि धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार, कार वेगात असताना अचानक टायर फाटल्याचा मोठा आवाज झाला. टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगत असलेल्या एका इमारतीजवळून थेट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर काही क्षणांतच कारला भीषण आग लागली.
या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही समोर आले आहे. रस्त्याला लागूनच इतकी मोठी दरी आहे, तरीही संरक्षक भींत किंवा कुंपण त्याठिकाणी नाही. त्यामुळे एक काळ्या रंगाची कार वेगाने जाताना दिसत आहे आणि अचानक नियंत्रण सुटल्याने ती दरीच्या दिशेने झेपावताना स्पष्टपणे दिसत आहे.
बचावकार्य आणि शोध मोहीम
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मदत पथक पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. बचाव कार्यात एका व्यक्तीचा मृतदेह गाडीच्या बाहेर पडलेला आढळला, तर दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या कारच्या आत सापडला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की मृतांची ओळख पटवणे कठीण झाले होते.
पोलीस कारवाई
अपघातग्रस्त कारचा नोंदणी क्रमांक PB-10-K-7531 असून ही गाडी पंजाबमधील लुधियाना येथील असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधून पोलिसांना एक आधार कार्ड सापडले आहे, ज्यावर लुधियाना येथील ताजपूर रोडचा पत्ता आहे. जरी अद्याप अधिकृतपणे मृतांची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी, या पुराव्यावरून तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हे दोघेही भाविक माता चिंतपूर्णी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला. उना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
“टायर फाटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक संशय आहे, परंतु तांत्रिक बाबींची तपासणी केल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल,” असे पोलीसांनी सांगितले. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून डोंगराळ भागात रस्त्याला लागून संरक्षक भींत किंवा कुंपण असायला हवे. त्यामुळे वाहन चालवताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
