पीटीआय, सिमला, हैदराबाद
हिमाचल प्रदेश, तेलंगण, गुजरात या राज्यांमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर आणि सोमवारी रस्ते अपघाताच्या विविध घटनांमध्ये एकूण १५ जणांचा बळी गेला. हिमाचल प्रदेशात वाहन दरीत कोसळून सहा जण ठार झाले. तेलंगणात स्पोर्ट्स बाइकला कारने धडक देऊन दोन लहान मुलांसह पाच जण मृत्युमुखी पडले. तर गुजरातमध्ये एका टेम्पोने ट्रकला दिलेल्या धडकेत चौघे जागीच मरण पावले.
हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील काकिरा येथे एक वाहन खोल दरीत कोसळून सहा जण ठार झाले आणि चौघे गंभीर जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. मृतांमध्ये गुजरातमधून आलेल्या पाच पर्यटकांचा समावेश आहे. अपघातग्रस्त टोयोटो इनोव्हा मनालीहून डलहौसीला जात असताना सोमवारी पहाटे ही घटना घडली. वाहनामध्ये एकूण १० जण प्रवास करत होते. अपघात इतका भीषण होता की, वाहनाचे अनेक तुकडे होऊन ते इतस्ततः विखुरले होते, असे पोलिसांनी सांगितले. जखमींची सुटका करण्यात बऱ्याच अडचणी आल्या. राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
तेलंगणच्या महूबबनगर जिल्ह्यात एक कार आणि स्पोर्ट्स बाइकचा अपघात होऊन दोन लहान मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. महबूबनगर बायपास मार्गवर रविवारी मध्यरात्रीनंतर एक कार यू-टर्न घेत असताना ती बाइकला धडकून हा अपघात झाला. त्यात बाइकवरील दोघे आणि वाहनातील तिघे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
गुजरातच्या आणंद जिल्ह्यामध्ये महामार्गावर एक टेम्पो ट्रकवर आदळून अपघात झाला. त्यामध्ये चार जण ठार झाले आणि पाच जण जखमी झाले. तारापूर – बगोदरा राज्य महामार्गावर सोमवारी सकाळी हा अपघात झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. मृतांमध्ये एक पाच वर्षीय बालक आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. चारही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे तारापूरचे पोलीस निरीक्षक मयूर शर्मा यांनी सांगितले. टेम्पोतील प्रवासी मजुरीसाठी दाहोदला जात होते. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा भाग अपघातप्रवण असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पाकिस्तानात व्हॅन दरीत कोसळून ११ मृत्युमखी
पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी व्हॅन दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातात किमान ११ जण ठार झाले आणि इतर अनेक जण जखमी झाले. स्वात जिल्ह्यातील मालम जब्बा या ठिकाणी हा अपघात झाला. मरण पावलेल्यांमध्ये वराच्या आईसह अन्य काही स्त्रिया आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दरीत कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
