Himanta Biswa Sarma Attack Congress : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी गुवाहाटीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी युद्धविराम व बांगलादेशच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “पाकिस्तानच्या डीजीएमओने भारत सरकारसमोर आत्मसमर्पण केल्यानंतरही आपण त्यांच्याबरोबर युद्ध चालू ठेवायला हवं का? काँग्रेसने याचं उत्तर द्यावं. तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी यूपीए सरकारच्या काळात जेव्हा भारतावर हल्ला केला होता तेव्हा ते काँग्रेसने काय केलं होतं?” असे काही प्रश्न सरमा यांनी उपस्थित केले आहेत.
“काँग्रेसवाले दावा करत आहेत की इंदिरा गांधींनी वेगळा बांगलादेश निर्माण केला. मग त्यांनी चिकन नेक का नाही घेतलं?” असा प्रश्न हिमंता बिस्व सर्मा यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “तुम्ही चिकन नेक जिंकून तिथे चांगले रस्ते बांधू शकला असतात. मात्र त्यांनी आज आमच्या (ईशान्य बारत) शेजारी एक कट्टरतावादी देश निर्माण केला आहे.” (चिकन नेक हा ईशान्य भारतातील छोटासा भाग आहे. सिलीगुडी कॉरिडॉरसाठी या संज्ञेचा वापर केला जातो. हा कॉरिडोर भारताच्या मुख्य भूमीला ईशान्य भारताशी जोडतो. याच मार्गाने आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा ही राज्ये थेट भारताशी जोडली आहेत.)
हिमंता बिस्व सरमा काय म्हणाले?
हिमंता बिस्व सरमा म्हणाले, “आज इंदिरा गांधी हयात असत्या तर मी त्यांना विचारलं असतं की तुम्ही १९७१ चं युद्ध जिंकलं होतं तर मग आमच्या शेजारी एक कट्टर इस्लामी देश बनवण्याची परवानगी का दिलीत? चिकन नेकबाबद चर्चा का केली नाही? ईशान्य भारतातील राज्यांना भारताच्या मूख्य भूमीशी जोडण्यासाठी आपण त्यावेळी कमीत कमी १०० किलोमीटरची जमीन घेऊ शकत होतो. ती जमीन का घेतली नाही? त्यावेळी चिकन नेकचा, ईशान्य भारताचा विचार का केला नाही?”
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला की “शिमला कराराच्या वेळी तुम्ही पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट का करून घेतला नाही? १९७१ च्या युद्धानंतर पाकिस्तानने गुडघे टेकले होते. त्यांच्या सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शस्त्रं टाकली होती. त्याचवेळी आपण पाकिस्तानवर दबाव निर्माण करून पाकव्याप्त काश्मीर मुक्त करून का घेतला नाही? तत्कालीन सरकारने चिकन नेकचा विचार का केला नाही? मात्र, आता पाकिस्तान सीमेवर जेव्हा जेव्हा आगळीक करतो तेव्हा तेव्हा भारताकडून त्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं.”