पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने राज्याची संसाधने बांगलादेशी मुस्लीम घुसखोरांसाठी वळवली असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी शनिवारी केला. राज्यात तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून दूर करणे आवश्यक आहे, अन्यथा आपण बंगाल गमावून बसू, असा दावा सरमा यांनी केला.

कालिमपोंग येथे एका सभेत भाषण करताना सरमा यांनी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. आसाम आणि त्रिपुरा येथील भाजप सरकारांनी बांगलादेशी मुस्लिमांचा भारतात होणारा प्रवेश रोखला. परंतु बंगालमध्ये मात्र बेकायदा घुसखोरांचे अतिक्रमण अविरतपणे सुरूच आहे, अशी टीका त्यांनी केली. “ममता यांनी बंगालचा संपूर्ण सरकारी खजिना बांगलादेशी मुस्लीम घुसखोरांसाठी राखून ठेवला आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी ही भूमी बांगलादेशी मुस्लिमांना विकली आहे,” असा आरोप सरमा यांनी केला.

मुख्यमंत्री झाल्यापासून ममता बॅनर्जी यांनी संपूर्ण बंगालचीच नासधूस केली. ममतांच्या कार्यकाळात उत्तर बंगालमध्ये कोणताही विकास झालेला नाही. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यास आम्ही या भागातून सर्व बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देऊ, अशे आश्वासन सरमा यांनी दिले.