नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांची पत्नी रिनिकी भुयान सरमा यांच्याकडे तीन देशांची पारपत्रे आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या पत्नीच्या मालमत्तेची माहिती उघड केलेली नाही, असे गंभीर आरोप काँग्रेसने रविवारी केले. मात्र, हिमांता बिस्वा सरमा यांनी हे आरोप फेटाळले. तसेच, ४८ तासांच्या आत काँग्रेस नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
आसाममध्ये ९ एप्रिलला विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असताना काँग्रेसच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषद आयोजित करून सरमा दाम्पत्यावर आरोप केले. खेरा म्हणाले की, “रिनिकी भुयान सरमा यांच्याकडे तीन देशांची पारपत्रे आहेत. संयुक्त अरब अमिरातीचे पारपत्र १४ मार्च २०२२ रोजी जारी करण्यात आले होते आणि त्याची मुदत १३ मार्च २०२७ रोजी संपत आहे.
दुसरे पारपत्र अँटिग्वा आणि बार्बुडा देशाचा आहे, तो २६ ऑगस्ट २०२१ रोजी जारी करण्यात आला आणि त्याची मुदत २५ ऑगस्ट २०३१पर्यंत आहे. तिसरे पारपत्र इजिप्तचे असून त्याचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२९ आहे.”
रिनिकी भुयान सरमा यांच्या नावावर दुबईमधील दोन मालमत्ता आहेत. याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्र दिलेली नाही, असे खेरा म्हणाले. त्याशिवाय रिनिकी यांच्या नावावर अमेरिकेच्या वायोमिंगस्थित एक कंपनीही आहे. हिमांता बिस्वा सरमा यांनी उपकंपन्या स्थापन करून आपला पैसा वायोमिंगमध्ये गुंतवला असल्याचा गंभीर आरोप खेरा यांनी केला. खेरा यांनी यावेळी आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ काही कागदपत्रेही दाखवली. हिमांता सरमा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी खेरा यांनी केली.
खेरा यांचे आरोप फेटाळताना ‘ते द्वेषपूर्ण, बनावट आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असून आसामच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे उत्तर हिमांता बिस्वा सरमा यांनी दिले. आसाममध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळत आहे, त्यामुळे काँग्रेस हताशपणे आपल्यावर निराधार आरोप करत असल्याची टीका हिमांता सरमा यांनी केली.
हिमांता बिस्वा सरमा यांचे संपूर्ण राजकारण मुस्लीम द्वेषावर आधारित आहे, तरीही त्यांच्या पत्नीकडे दोन मुस्लीम देशांची पारपत्रे आहेत.
– पवन खेरा, काँग्रेस नेते
त्यांनी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक विसंगती आहेत. त्यावरून हा डिजिटिल गैरप्रकाराचा केलेला सुमार प्रयत्न आहे हे दिसून येते.
– हिमांता बिस्वा सरमा, मुख्यमंत्री, आसाम
