Hindu businessman murdered in Bangladesh: बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीची क्रूर हत्या करण्यात आली आहे. सोमवारी (०९ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हिंदू व्यावसायिकाची हत्या केली. देशात संसदीय निवडणुकीचे वातावरण असताना सातत्याने हिंदू नागरिकांच्या होणाऱ्या हत्येच्या घटना चिंतेच्या विषय ठरल्या आहेत. मतदानासाठी तीन दिवस उरले असताना मायमेन जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
एकाच ठिकाणी दोन हिंदूंची हत्या
सुशेन चंद्र सरकार (वय ६२) असे हत्या झालेल्या हिंदू व्यावसायिकाचे नाव आहे. सुशेन सरकार तांदूळ व्यापारी होते अशी माहिती समोर आली आहे. भाई भाई एन्टरप्राईसचे ते मालक होते. सरकार यांची हत्या करण्यात आली त्याच ठिकाणी यापूर्वी दिपू चंद्रा दास या हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. जमावाने अमानुष मारहाण करत दिपू चंद्राला ठार केले होते.
पोलिसांनी काय माहिती दिली?
मायमेन जिल्ह्यातील बाजाराच्या मध्यभागी सरकार यांची हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञातांनी सरकार यांना दुकानात गाठून धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. हल्लेखोरांनी दुकानातून लाखो रुपयांची रोकड देखील लंपास केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दुकानाचे शटर बंद करुन सरकार यांच्यावर हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. कुटुंबीयांना दुकानात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सरकार यांचा मृतदेह आढळून आला. सरकार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे पोलिस म्हणाले.
सरकार यांचा मुलगा काय म्हणाला?
“आम्ही गेल्या अनेक वर्षापासून तांदळाचा व्यापार करत आहोत. आमच्याशी कोणाची दुश्मनी नव्हती. हल्लेखोरांना दुकानात वडिलांवर हल्ला करुन त्यांची हत्या केली. खून केल्यानंतर दुकानातून रोकड देखील चोरी केली, असे मृत सरकार यांचा मुलगा सुजान सरकार यांनी माहिती देताना म्हटले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे सुजीत म्हणाले.
ऑगस्ट २०२४ नंतर वाढल्या घटना
बांगलादेशध्ये केंद्रीय निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. मोहम्मद युनिस यांच्या अंतरिम सरकारमध्ये हिंदूंवर वाढते हल्ले चिंताजनक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व्यक्त केले जात आहे. ऑगस्ट २०२४ नंतर हिंदूंवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. अल्पसंख्याक नागरिकांवरील हल्ले आणि देशातील लोकशाहीची मूल्ये यावरुन सवाल उपस्थित केला जात आहे. ऑगस्ट २०२४ पासून बांगलादेशमध्ये हजारो हिंदू नागरिकांवर जीवघेणे हल्ले करण्यात आले आहेत. यात अनेकांचा खून देखील झाला. भारताने बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन चिंता व्यक्त केली आहे.
