पीटीआय, ढाका

बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यातील त्रिशाल येथे एका दुकानात हिंदू व्यापाऱ्याची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. सोमवारी रात्री बोगार बाजार चौकात हा प्रकार घडला, अशी माहिती त्रिशाल पोलीस ठाण्याचे प्रमुख मोहम्मद फिरोज होसैन यांनी एका वृत्तसंकेतस्थळाला दिली. सुसेन चंद्र सरकार (वय ६२) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.

मृत सरकार हे ‘भाई भाई एंटरप्राइज’ या दुकानाचे मालक होते. ते दक्षिणकांडा या गावचे रहिवासी होते. हल्लेखोरांनी सरकार यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत ते रक्ताच्या थारोळ्यात दुकानातच पडले होते. हल्लेखोरांनी हल्ला करून दुकान बंद केले आणि तेथून पळ काढला. सरकार यांचा शोध घेत जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी दुकानाचे शटर उघटले तेव्हा हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना तातडीने मयमनसिंह वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत मृत सरकार यांचे पुत्र सुजन सरकार म्हणाले, ‘आमचा भाताचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे. आमच्याशी कोणाचेही वैर नव्हते. वडिलांची निर्घृण हत्या केल्यानंतर गुन्हेगारांनी दुकानातून काही लाख टका (बांगलादेशचे चलन) चोरून नेले.’ वडिलांच्या मारेकऱ्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.