मोहरम हा मुस्लिम समुदायाचा सण मानला जातो. इस्लाममध्ये मोहरम हा दुःखाचा महिना मानला जातो. मुस्लिम समाज विशेषत: शिया समुदायाचे लोक या महिन्याच्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी रोजा ठेवतात. मोहरममध्ये पैगंबर हजरत मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्यासह कर्बलाच्या लढाईत शहीद झालेल्या ७२ शहीदांची शहादत आठवून शोक व्यक्त केला जातो. मात्र, कर्नाटकात एक असे गाव आहे जिथे मुस्लिम समुदाय नाही तर हिंदू समुदायाकडून मोहरम साजरा केला जातो. कारण या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदूंकडून साजरा केला जातो मोहरम

कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील हिरेबिदानूर गावात गेल्या अनेक वर्षांपासून एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही. मात्र, या गावात हिंदू समुदायाकडून वर्षातून पाच दिवस मोहरम साजरा केला जातो. या काळात गावातील रस्त्यांना रोषणाईने केली जाते. तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात बहुसंख्य लोक कुरुबा आणि वाल्मिकी समाजातील आहेत. या गावात एकमेव मशीद आहे. जिला ‘फकिरेश्वर स्वामींची मशीद’ असे म्हणतात. या मशिदीत गावकरी नवस पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात. या मशिदीच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आमदारांनी नुकतेच ८ लाख रुपये मंजूर केले आहेत.

हेही वाचा- VIDEO: हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात ढगफुटी, एकाचा मृत्यू; घरांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान

काय आहे मोहरमचा इतिहास?

हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसन आणि हुसेन ही दोन्ही मुले होती. पैगंबरांचे हे दोन्ही नातू करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात ‘तारीख-ए-इस्लाम’ हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. इस्लाममध्ये त्यांचा प्रमुख नेता अर्थात खलिफा निवडण्याचा रिवाज आहे. मोहम्मद पैंगबरांनंतर असे चार खलिफा निवडले गेले. परंतु, काही वर्षांनी उमैया वंशांचे संस्थापक, इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने स्वत:ला खलिफा घोषित केले. परंतु, इस्लाममध्ये ‘बादशाही’ची संकल्पना नव्हती. शिवाय यजीद एक क्रूर शासकही होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. त्यामुळे यजीदला खलिफा मानण्यास पैगंबरांच्या नातवंडांसह अनेकांनी नकार दिला.

हुसैनने आपल्याला खलिफा मानण्यास नकार दिल्यास त्याचे शीर कलम करण्याचे फर्मान यजीदने सोडले. हिजरीच्या महिन्यातील एका रात्री हुसैनला राजभवनात बोलावून यजीदचं हे फर्मान सुनावण्यात आलं. परंतु, हे फर्मान नाकारून हुसैन मक्केच्या दिशेने जायला निघाले. मात्र संतप्त यजीदने आपले सैनिक हुसैनना मारण्यासाठी पाठवले. हुसैन आपल्या परिवार व मित्रांसोबत करबला इथे पोहोचले असताना यजीदच्या सैन्याने त्यांना गाठले. हुसैन यांनी या सैन्याला इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा परंतु, सैन्यावर त्याचा परिणाम झाला नाही.

हेही वाचा- समुद्रयान मोहीम : सहा हजार मीटर खोल समुद्रात पाठवणार मानव; भारताची पहिलीच मानवयुक्त सागरी मोहीम

अखेर हे युद्ध करबलामध्ये सुरू झाले. हुसैन यांचे ७२ अनुयायी या लढाईत मारले गेले. या युद्धभूमीत केवळ हुसैन आणि त्यांचा ६ महिन्यांचा पुत्र अली असगर उरले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हुसैन यांनी सैन्याकडे पाण्याची मागणी केली. परंतु, पाणी देण्याऐवजी या चिमुकल्याचा बाण मारून जीव घेण्यात आला. या युद्धात हुसैन यांनाही मारण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे ‘मातम का महिना’ म्हणून पाहतात. त्यामुळे हा महिना मुस्लीम बांधव दु:ख म्हणून साजरा करतात. आणि हसन हुसैन यांची आठवण काढतात.

शोक व्यक्त करताना शिया समुदायाचे लोक काय म्हणतात?

मोहरमच्या दिवशी शोक व्यक्त केला जातो तेव्हा शिया समुदायाचे लोक ‘या हुसैन, हम न हुए।’ असे म्हणतात. त्याचे विशेष महत्त्व आहे. शोक व्यक्त करणारे लोक म्हणतात की ‘हजरत इमाम हुसेन, आम्ही खूप दुःखी आहोत’ कारण आम्ही कर्बलाच्या युद्धात तुमच्यासोबत नव्हतो. आम्ही देखील इस्लामचे रक्षण करण्यासाठी तुमच्यासोबत शहीद झालो असतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu family celebrate muharram for 5 days in karnataka village dpj
First published on: 08-08-2022 at 20:28 IST