Chinmoy Krishna Das Bangladesh Hindu Leader Parole: बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हक्कासाठी भांडणारे नेते चिन्मय कृष्ण दास हे गेल्या काही काळापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी त्यांना केवळ पाच तासांसाठी तुरुंगातून पॅरोल देण्यात आला, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने दिले आहे. नोव्हेंबर २०२४ साली देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय दास यांना अटक करण्यात आली होती. २०२४ साली राजकीय अस्थिरतेदरम्यान केलेल्या आंदोलनात राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला होता. तेव्हापासून ते जामिनाशिवाय तुरुंगात आहेत.

चिन्मय दास यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अर्ज केला होता. चट्टोग्राम जिल्ह्याचे उपायुक्त मोहम्मद झहीदुल इस्लाम मिया यांनी दास यांना सोडण्याचे आदेश दिले. चिन्मय दास यांच्या मातोश्री संध्या राणी धार (वय ७०) यांचा गुरुवारी सकाळी हाथझारी येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता.

बांगलादेशमधील डेली स्टार वृत्तपत्राने इस्लाम मिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दास यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अर्ज केला होता. कायद्यानुसार आम्ही चिन्मय कृष्ण दास यांना पाच तासांचा पॅरोल बहाल केला.

आईला शेवटचे पाहता आले नाही

चिन्मय दास यांच्या आईला आपल्या मुलाला पाहायचे होते, यासाठी वारंवार अर्ज करूनही तुरुंग प्रशासनाने त्यांचा पॅरोल अर्ज फेटाळला होता. कालबेला वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, संध्या राणी धार यांना आयुष्याचे शेवटचे दिवस आपल्या मुलाबरोबर त्याच्या आश्रमात व्यतीत करायचे होते. मात्र त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

अंत्यविधीचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर चिन्मय कृष्ण दास हे अंत्यविधीला उपस्थित राहिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आईला शेवटचा निरोप देत असताना चिन्मय कृष्ण दास यांना अश्रू अनावर होत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांना पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत. चिन्मय कृष्ण दास हे बांगलादेशमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंच्या अधिकारांसाठी काम करत आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करण्यात आले, तेव्हा चिन्मय कृष्ण दास त्याविरोधात आवाज उचलत होते.

नोव्हेंबर २०२४ मध्ये चिन्मय दास यांना अटक झाल्यानंतर बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी आंदोलने सुरू झाली. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि तोडफोड यासह इतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. चिन्मय दास एकूण सहा फौजदारी प्रकरणांचा सामना करत आहेत. त्यापैकी चार प्रकरणांमध्ये त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.

मात्र देशद्रोहाच्या खटल्यात त्यांना जामीन देण्यात आलेला नाही. चिन्मय दास यापूर्वी इस्कॉनशी संबंधित होते.