हरियाणाच्या अंबाला सेंट्रल जेलमधून आणलेल्या मातीने नथुराम गोडसेचा पुतळा बनवणार असल्याचे हिंदू महासभेने म्हटले आहे.  या सेंट्रल जेलमध्ये महात्मा गांधींच्या मारेकरी गोडसेला १९४९ मध्ये फाशी देण्यात आली होती. सोमवारी गोडसेच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदू महासभेने पुतळा बनवण्याची घोषणा केली आहे.

“ज्या अंबाला तुरुंगात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली होती, त्या तुरुंगातून हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात माती आणली आहे. या मातीचा वापर गोडसे आणि आपटे यांचे पुतळे बनवण्यासाठी केला जाईल आणि ते ग्वाल्हेर येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात बसवले जातील,” असे संघटने राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी सांगितले.

“महासभेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील ‘बलिदान धाम’ येथे गोडसे आणि आपटे यांचे पुतळे बसवले. आम्ही प्रत्येक राज्यात असे बलिदान धाम बांधू,” असे भारद्वाज यांनी सांगितले. दरम्यान, भारद्वाज यांनी देशाच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोपही केला आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोकांची हत्या झाली, असंही म्हटलं.

दरम्यान, ग्वाल्हेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सत्येंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, “सोमवारी हिंदू महासभेचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम झालेला नाही. तसेच आतापर्यंत एकही पुतळा बसवण्यात आलेला नाही आणि पोलीस संघटनेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत,” असे ते म्हणाले.