बांगलादेशातून स्थलांतर करून आलेल्या आणि निर्वासितांच्या छावणीतील हिंदू बांधवांना देशात आसरा देणे आपले कर्तव्य असल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आसाम येथील एक जाहीर सभेत सांगितले. बाकीच्या देशांत अन्यायाला तोंड द्याव्या लागणा-या हिंदूंविषयी भारताची काही तरी जबाबदारी आहे. अन्याय झालेले हे हिंदू बांधव भारताशिवाय दुसरीकडे कुठे जाणार असा सवालसुद्धा मोदींनी या सभेत उपस्थित केला. आगामी निवडणुकांमध्ये भाजप सत्तेत आल्यास सरकार या स्थलांतरित हिंदूंना आसरा देईल व त्यांचे योग्यप्रकारे पुनवर्सन करेल असे आश्वासन नरेंद्र मोदींनी या सभेमध्ये दिले आहे. सुरूवातीच्या काळात पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेले हिंदू राजस्थान आणि गुजरातमध्ये आश्रय घेत होते. मात्र, माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांच्या काळात या स्थलांतरितांचे देशातील अन्य भागांत पुनवर्सन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या गेल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी आसाम सरकारवर मतांच्या राजकारणासाठी निर्वासितांच्या छावणीतील हिंदूंच्या मानवी हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप केला. स्थलांतरित हिंदूंना अधिकृतरित्या मतदान करण्याचा हक्क द्यावा अशी विनंती मोदींनी निवडणुक आयोगाला केली आहे. एका विशिष्ट समाजाला मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी काँग्रेसकडून या स्थलांतरितांच्या मतदानाचा हक्क डावलला जात असल्याची टीका मोदींनी केली.