कर्नाटकमधील म्हैसूर येथील हिंदू संघटनांच्या धमक्यांना न घाबरता हिंदू तरुणी आणि मुसलमान तरुणाने प्रेमविवाह केला. म्हैसूर येथील अशिता बाबू आणि शकील अहमद बारा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. हिंदू संघटनांकडून होत असलेला विरोध झुगारून अशिता आणि शकीलने लग्न करण्याचे धाडस केले. शकीलबरोबर लग्न करण्यासाठी आठवड्याभरापूर्वी अशिताने धर्मपरिवर्तन करून शाइस्ता नाव धारण केले. त्यांच्या निकाहाच्या ठिकाणी हिंदू संघटनांनी जोरदार निदर्शने केली. बजरंग दल आणि अन्य हिंदू संघटनांचा दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. परंतु, अशिता आणि शकीलचे कुटुंबीय दोघांच्या लग्नाविषयी ठाम होते.
एकमेकांच्या शेजारी राहात असलेल्या अशिता आणि शकीलने शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण बरोबर घेतले असून, दोघांनी एमबीएचे शिक्षणदेखील एकत्र घेतले आहे. त्यांच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबीयांकडून कोणताही विरोध नसताना अशिता आणि शकीलमधील प्रेमसंबंध ‘लव्ह जिहाद’ असल्याचे सांगत काही हिंदू संघटना यास विरोध करू लागल्या. असे असले तरी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून दोन्ही कुटुंबाना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले.
हा ‘लव्ह जिहाद’ असल्याचे सांगत, जर हे खरोखरीच प्रेम असेल तर आम्हाला काही अडचण नाही. परंतु, हा जबरदस्तीचा मामला दिसत असल्याचे मत कर्नाटकमधील विश्व हिंदू परिषदेचे सचिव बी सुरेश यांनी या लग्नाविषयी बोलताना व्यक्त केले.
दोन्ही कुटुंबियांनी लग्नाला होत असलेल्या विरोधामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू दिले नाही. अशिताचे वडिल नरेंद्र बाबू डॉक्टर असून लग्नाच्या ठिकाणी जाताना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, भारतात आपण सर्व समान आहोत. यातून विरोधकांना हाच संदेश जातो. त्यांना हे कळणे गरजेचे आहे. सर्वजण आनंदी असून बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींच्या विरोधामुळे काही फरक पडत नाही.