Hindu Refugee in Bangladesh : बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथील पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला असून त्या भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशीमधील परिस्थिती बिघडल्यानंतर या घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बांगलादेशात वास्तव्यात असलेले जवळपास १ कोटी हिंदू निर्वासित भारतात येतील, अशी भीती भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केली आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अधिकारी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या लोकांनी बांगलादेशातील एक कोटी हिंदू निर्वासितांच्या प्रवेशासाठी तयार राहावे. बांगलादेशात हिंदूंची कत्तल केली जात आहे. रंगपूर नगर परिषदेचे नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली आहे. सिराजगंज येथे तेरा पोलिसांची हत्या करण्यात आली होती, त्यापैकी नऊ हिंदू होते. नोआखली येथील हिंदूंची निवासस्थाने जाळण्यात आली आहेत. मी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्र सरकारशी बोलण्याची विनंती करू इच्छितो. कारण नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात हे स्पष्टपणे नमूद केले आहे. बांगलादेशात जर कोणी धार्मिक हिंसाचाराचा बळी ठरला तर आपण त्यांना आवश्यक आश्रय दिला पाहिजे”, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. हेही वाचा >> Taslima Nasreen : शेख हसीनांवर तस्लिमा नसरीन यांची टीका, “ज्यांना खुश करण्यासाठी मला देश सोडायला लावला…” बांगलादेशातील सध्याची परिस्थिती येत्या तीन दिवसांत बदलली नाही, तर बांगलादेश कट्टरतावादी शक्तींच्या तावडीत येईल, असेही ते म्हणाले. "एक कोटी हिंदू निर्वासितांना आश्रय देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा. किमान मी त्यासाठी तयार आहे", असे ते म्हणाले. १९७१ प्रमाणे आताही बांगलादेशातून आलेल्या हिंदू निर्वासितांना आश्रय देण्याचे आवाहनही त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंदू जनतेला केले. हेही वाचा >> २५ वर्षांपासून सत्तेवर, आर्थिक क्रांतीही घडवली; तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोण? बांगलादेशात नेमकं काय घडतंय? बांगलादेशात गेल्या महिन्यापासून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थी आंदोलन सुरू होते. शनिवारी आंदोलन अधिक तीव्र होऊन त्याला हिंसक वळण लागले. रविवारी झालेल्या सत्ताधारी आवामी लिगचे कार्यकर्ते आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ पोलिसांसह १००पेक्षा जास्त लोक मारले गेले. काही माध्यमांनी मृतांचा आकडा ३००हून अधिक असल्याचा दावा केला आहे. या दंगलींनंतर सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लावली होती. सोमवारी हसीना यांच्या विरोधकांनी आंदोलकांच्या साथीने ढाक्यामध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि हसीना यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या लष्कराच्या विमानाने देशाबाहेर पळाल्या.