नवी दिल्ली : गुजरात दंगलीबाबत वृत्तपटावरून उफाळलेल्या वादानंतर आता ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) या वाहिनीवर देशात संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे झाली आहे. ‘हिंदू सेना’ या संघटनेने अॅड्. बरूनकुमार सिन्हा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्यासह बिरेंद्रकुमार सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत बीबीसीने केलेल्या हिंदूविरोधी, देशविरोधी वार्ताकन आणि वृत्तपटासाठी वाहिनीच्या भारतातील प्रतिनिधींची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशीचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. २००२ साली उसळलेल्या दंगलीवर वृत्तपट तयार करून बीबीसी आपला स्वत:चा अजेंडा राबवित असून त्यामुळे देशाचे ऐक्य धोक्यात आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४पासून देशाच्या सर्वागिण विकासाने वेग पकडला आहे. भारतविरोधी गट आणि माध्यमे, विषेशत: बीबीसी यांना हे सहन झालेले नाही. त्यामुळेच बीबीसी भारत आणि भारत सरकारबाबत पक्षपात करीत आहे.
– विष्णू गुप्ता, अध्यक्ष, हिंदू सेना