US Ohio Swaminarayan Temple Vandalism: अमेरिकेतील ओहायो राज्यातील ग्रेटर क्लीव्हलँड परिसरातील एका हिंदू मंदिरावर शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) अज्ञात समाजकंटकांनी विटा फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दगडफेकीत मंदिराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी मंदिरात पुजारी आणि भाविक उपस्थित होते, अशी माहिती ‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (कोहना) या संस्थेने दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
ओहायो राज्यातील रिचमंड हाइट्स येथील ‘श्री स्वामीनारायण वडतलधाम हिंदू मंदिर’ येथे शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना घडली. ‘हिंदू अमेरिकन फाउंडेशन’ने ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, एक किंवा त्याहून अधिक समाजकंटकांनी मंदिराच्या इमारतीवर विटा भिरकावल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
‘एफबीआय’कडे तक्रार; सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून स्थानिक पोलीस त्याचा तपास करत आहेत. तसेच एफबीआय आणि नागरी हक्क प्राधिकरणाशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे, असे ‘एचएएफ’ने स्पष्ट केले. संस्था मंदिर प्रशासनाच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे.
द्वेषयुक्त गुन्ह्याचा संशय
संस्थेने या घटनेमागे द्वेषयुक्त गुन्ह्याचा (हेट क्राइम) संशय व्यक्त केला आहे. “सध्या अमेरिकेतील हिंदू समुदायाविरोधात द्वेष पसरवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हा संभाव्य ‘हेट क्राइम’चा प्रकार घडला आहे,” असे नमूद करत प्रशासनाने हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ‘एचएएफ’ने केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणांनी या प्रकाराचा जाहीर निषेध करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
रिचमंड हाइट्सच्या महापौर किम थॉमस आणि स्थानिक प्रशासनाने घटनेचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘कोहना’ने केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणत्याही संशयिताची ओळख जाहीर केलेली नाही, तसेच या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. तसेच या हल्ल्यामागे धार्मिक हेतू असल्याचे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.
‘हिंदू हेरिटेज मंथ’दरम्यानच घटना
ओहायोमध्ये ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून साजरा केला जातो. तसेच नवरात्रोत्सवाचीही तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने स्थानिक हिंदू समुदायामध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२२ मध्ये न्यूयॉर्कमधील ‘श्री तुलसी मंदिरा’बाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, तर डिसेंबर २०२३ मध्ये कॅलिफोर्नियातील नेवार्क येथील ‘एसएमव्हीएस श्री स्वामीनारायण मंदिरा’वर आक्षेपार्ह मजकूर रंगवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
