scorecardresearch

कर्नाटक: मशिदीच्या डागडुजीदरम्यान सापडले मंदिराचे अवशेष; VHP ने केली ‘ही’ मागणी तर प्रशासनाने केलं शांतता राखण्याचं आवाहन

मिलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचं काम सुरु असताना हे अवशेष सापडले आहेत.

Hindu temple like structure found during renovation of mosque
या संदर्भात तपास सुरु करण्यात आलाय (फोटो एएनआयवरुन साभार)

कर्नाटकमधील मंगळुरु येथील एका मशिदीच्या डागडुजीच्या कामाकाजाच्या वेळी मशिदीखाली हिंदू मंदिरा सदृश्य असे काही अवशेष सापडले आहेत. मंगळुरुपासून काही अंतरावर असणाऱ्या या मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी परसरली असून हा सारा प्रकार गुरुवारी समोर आल्याची माहिती एनआय या वृत्तसंस्थेनं दिलीय.

मिलाली येथील जुमा मशिदीच्या डागडुजीचं काम सुरु आहे. यानिमित्त सुरु असणाऱ्या खोदकामादरम्यान हे अवशेष सापडलेत. मशिदीचं व्यवस्थापन पाहणाऱ्या समितीच्या पुढाकारानेच हे काम केलं जात होतं. हे अवशेष सापडल्यामुळे आता पूर्वी या ठिकाणी हिंदू मंदिर होतं असा दावा केला जातोय. विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात धाव घेतली असून कागदोपत्री सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय या ठिकाणच्या काम थांबवण्यात यावं अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय.

दरम्यान दक्षिण कानडा जिल्ह्याच्या आयुक्तांनी या अवशेषांची काळजी घेण्याचे आणि ते आहे तसेच जतन करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने तातडीने या जमीनीसंदर्भातील कागदोपत्री पडताळणी सुरु केली असून लोकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय.

“मला त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून यासंदर्भात माहिती मिळाली. या जमीनीची मालकी कोणाकडे होती आणि ती कशी हस्तांतरित होत आली याची पहाणी सध्या जिल्हा प्रशासन करत आहे. आम्ही दोन्ही खात्यांकडून म्हणजेच जमीनीची नोंद ठेवणारा विभाग आणि वफ्फ बोर्डाकडून माहिती घेणार आहोत,” असं दक्षिण कानडाचे उपायुक्त राजेंद्र के. व्ही. यांनी स्पष्ट केलं.

“सध्या केल्या जाणाऱ्या दाव्यांची पडताळणी करुन आम्ही यासंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ. तोपर्यंत आम्ही या अवशेषांची काळजी घेण्याचे निर्देश दिले असून लोकांनी कोणताही अर्थ यामधून काढू नये असं आवाहन करतो. लोकांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं,” असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hindu temple like structure found during renovation of mosque near mangaluru scsg

ताज्या बातम्या