पीटीआय, भुवनेश्वर

ओडिशातील महानदीवर बांधण्यात आलेल्या हिराकूड धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आल्याने राज्यातील ३० पैकी २० जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोक बाधित झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये कटक, पुरी, खुर्दा आणि जगतसिंगपूर या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील एकूण एक लाख ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

छत्तीसगडमध्ये महानदीचा उगम असलेल्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदीची पातळी वेगाने वाढत आहे. परिणामी, धरण भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पुराची तीव्रता कमी राहिली आहे. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफसह राज्यातील आपत्कालीन यंत्रणांची १३६ पथके विविध जिल्ह्यांत कार्यरत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

मध्य, दक्षिण गुजरातमध्ये जनजीवन विस्कळीत

अहमदाबाद : मध्य आणि दक्षिण गुजरातमध्येही शुक्रवारी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सुरतमधील १५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत. सुरत, खेडा, आणंद, भरूच आणि नर्मदासह सात जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस पडला असून काही सखल भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील विविध भागांत एनडीआरएफची १७, तर एसडीआरएफची ३३ पथके बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आसाममध्ये पूरग्रस्तांना आर्थिक दिलासा

गुवाहाटी : आसाममधील पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चार जिल्ह्यांतील विमा दावे वेगाने बाधित कुटुंबांना मिळावे, यासाठी विमा कंपन्या आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांना सूचना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी दिली. राज्यस्तरीय बँकर समितीच्या विशेष बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. पूरग्रस्तांच्या कर्जफेडीसाठी सहा महिने स्थगिती देण्यात आली असून ऑगस्ट महिन्यात पूरग्रस्तांना अंतरिम मदत म्हणून १५ हजार रुपये तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. राज्यात आतापर्यंत पावसाशी संबंधित दुर्घटनांत ८० लोक मृत्युमुखी झाले आहेत.

काश्मीरलाही तडाखा

श्रीनगर : काश्मीरला पावसाने जोरदार तडाखा दिला असून बडगाम, बारामुल्ला आणि बांदीपोरा येथील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.