पीटीआय, थिरुवनंतपुरम
प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ के. एन. पणिक्कर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. इतिहास क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले पणिक्कर हे त्यांच्या मार्क्सवादी इतिहास लेखनासाठी आणि शिक्षण क्षेत्रात धर्मनिरपेक्ष व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करण्यासाठी ओळखले जात होते. पणिक्कर यांच्या मागे दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे.
पणिक्कर हे जातीवादाचे प्रखर टीकाकार होते. आधुनिक भारतीय इतिहासाच्या अभ्यासात पुरोगामी दृष्टिकोन रुजवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. उच्च शिक्षणानंतर पणिक्कर नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) इतिहास विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी पुढे विभागप्रमुख म्हणूनही काम पाहिले. ते ‘केरळ कौन्सिल फॉर हिस्टोरिकल रिसर्च’चे संस्थापक अध्यक्ष होते आणि २००१ ते २०१७ या काळात त्यांनी संस्थेचे नेतृत्व केले.
पणिक्कर यांनी परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. २००८ मध्ये भारतीय इतिहास काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी भारतीय इतिहास, विशेषत: वसाहतवाद आणि आधुनिकता या विषयांवर अनेक प्रभावी ग्रंथ लिहिले आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, माकपचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
