गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणांची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. मुंबईच्या वरळी भागात एका श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने बाईकवर जाणाऱ्या पती-पत्नीला जोरात धडक दिल्यानंतर पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळाली. अशीच एक पाकिस्तानातील घटना गेल्या दोन आठवड्यात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी माफ केलं असून त्यावरून आता त्यांच्यावरच टीका होत आहे. पीटीआयनं या प्रकरणाचं वृत्त दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना १९ ऑगस्ट रोजीची आहे. आरोपी तरुणी नताशा दानिशनं तिच्या एसयूव्ही कारनं पाकिस्तानमधील कराचीतल्या वर्दळीच्या करसाझ रोडवर एका बापलेकीला जोरात धडक दिली. इम्रान आरिफ व त्यांची मुलगी अमना आरिफ अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघे या भागातून जात असताना नताशानं त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये दोघा व्यक्तींचा मृत्यू झाला. पोलिसांनी नताशा दानिशला ताब्यात घेतलं व तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर नताशा बघ्यांना “तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत नाही”, असं सुनावतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
इम्रान आरिफ हे पेपर विक्रेते होते, तर त्यांची मुलगी अमना एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. यासंदर्भात खटला दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयासमोर सविस्तर सुनावणी झाली. शुक्रवारी याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील उझैर घोरी यांनी माध्यमांना सांगितलं की मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आरोपी महिलेला माफ केलं आहे.
French woman: १० वर्ष, ५० लोक आणि १०० वेळा बलात्कार; पत्नीला अमली पदार्थ देऊन पतीचं क्रूर कृत्य
आरोपी महिलेला मानसिक आजार?
दरम्यान, बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपी महिलेला मानसिक आजार असल्याचा दावा केला असून २००५ सालापासून तिच्यावर उपचार चालू असल्याचंही न्यायालयाला सांगितलं. शुक्रवारच्या सुनावणीनंतर दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या तडजोडीचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. त्यानंतर आरोपी नताशा दानिशला जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर सोशल मीडियावर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी पैसे घेऊन आरोपीला माफी दिल्याचा दावा केला जात आहे.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये शरिया कायद्यामध्ये आरोपीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असला, तरी त्याला पीडित व्यक्तीचे नातेवाईक माफ करू शकतात. या कायद्याला Qisas and Diyat Law असं म्हटलं जातं. आरोपी नताशाला जामीन मंजूर झाल्यानंतर आता ती जगभरात कुठेही प्रवास करू शकते, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील अमिर मनसूब यांनी दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.