चीनमधून उगम पावलेल्या करोनानं बघता बघता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. करोना विषाणूपुढे प्रगत देशही हतबल झाल्याचं दिसून आलं आहे. त्यात करोनाच्या जीवघेण्या व्हेरियंटमुळे उपचार पद्धतीत बदल करावे लागत आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेतून एका धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका एचआयव्हीबाधित महिलेला गेल्या वर्षी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर या महिलेच्या शरीरात असलेल्या करोना विषाणूने ३२ वेळा आपली रचना बदलली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या बाबतचा अहवाल मेडीकल जरनल मेडआरक्सिवमध्ये देण्यात आला आहे. मात्र याबाबतचं पुनरावलोकन अद्याप केलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेतील क्वाझलू नेटल भागात करोना विषाणूंची नवी रुपं समोर आली आहेत. या भागात प्रत्येक ४ पैकी एका प्रौढ व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील ३६ वर्षीय महिलेला २००६ साली एचआयव्हीची बाधा झाली होती. त्यानंतर तिची रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत गेली. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये तिला करोनाची लागण झाली. यावेळी तिच्या शरीरात करोना विषाणूंमध्ये बदल होत असल्याचं दिसून आलं. विषाणूंमुळे स्पाइक प्रोटीनमध्ये १३ उत्प्रेरक जमा झाल्याचं निष्पन्न झालं. तर विषाणूंमध्ये १९ अनुवांशिक बदल झाल्याचं दिसून आलं. यापैकी काही व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यात इंग्लंडच्या E484K या B.1.1.7 चा अल्फा व्हेरियंट आणि दक्षिण आफ्रिकेतील N510Y या B.1.351 चा बिटा व्हेरियंटचा समावेश आहे. या महिलेच्या माध्यमातून इतरांना संसर्ग झाला की नाही हे अद्याप कळू शकलेलं नाही.

आसाम Video: मनोबल वाढवण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये PPE किट घालून रुग्णांसोबत डान्स

एचआयव्हीबाधिताची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांना करोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या शरीरात करोना विषाणूंची नवे व्हेरियंट तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नवे व्हेरियंट आढळून येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारची आणखी काही रुग्ण समोर आल्यास एचआयव्हीबाधित रुग्णांमधील नव्या विषाणूंची माहिती घेणं शक्य होईल, असं संशोधक टुलिओ दी ऑलिवेरा यांनी सांगितलं. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांमध्ये करोनाचे विषाणू जास्त काळ राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. संबंधित महिलेला करोनाची सौम्य लक्षणं होती. तरी देखील करोना विषाणू बाळगून होती. त्यामुळे भविष्यात अधिक वेगाने चाचणी आणि उपचारांचा विस्तार करण्याच आव्हान त्यांनी केलं आहे.