उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने राज्यातील सर्व मदरशांना स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हणण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अनेक मुस्लिम धर्मगुरुंनी या विरोधात वक्तव्ये केली असून आता यामध्ये उत्तर प्रदेशमधील बरेलीच्या काझींची भर पडली आहे. स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकवा जावा, मात्र राष्ट्रगीत म्हणू नका, असा आदेश बरेचीच्या काझींकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

‘स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तिरंगा फडकावा. मात्र राष्ट्रगीत म्हणू नका,’ असा फतवा बरेलीचे काझी असजद आर. खान यांच्याकडून जारी करण्यात आला आहे. खान यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रजा-ए-जमातचे प्रवक्ते नासिर कुरेशी यांनीदेखील मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येईल. मात्र राष्ट्रगीत म्हटले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी एक पत्रकदेखील प्रसिद्ध केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

उत्तर प्रदेश मदरसा बोर्ड परिषदेकडून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आदेश जारी करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनादिवशी मदरशांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे छायाचित्रण करण्यात यावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनादिवशी सकाळी ८ वाजता मदरशांमध्ये तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हणण्याचे आदेशदेखील मदरसा बोर्ड परिषदेकडून देण्यात आले आहेत.