दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत राजकारणात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी भाष्य केले असून राजकारणातील प्रवेशाबद्दल चर्चा सुरु असल्याचे सांगितले आहे. याबद्दलची चर्चा पूर्ण होऊन निर्णय घेतल्यावरच याबद्दलची घोषणा केली जाईल, असे रजनीकांत यांनी सांगितले आहे. राजकारणातील प्रवेशाबद्दल निर्णय घेण्यासाठी काही राजकीय नेत्यांची भेट घेतली असल्याची माहिती रजनीकांत यांनी दिली. मात्र या बैठकीच्या स्वरुपाविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

‘मी काही राजकीय नेत्यांसोबत चर्चा केली. राजकीय नेत्यांना भेटल्याचे मी नाकारत नाही. आम्ही चर्चा करत आहोत आणि याबद्दल निर्णय झाल्यावर त्याची घोषणा करण्यात येईल,’ असे रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले. आठवड्याच्या सुरुवातीला रजनीकांत यांनी हिंदू मक्कल कातची संघटनेच्या सदस्यांची निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मागील महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना ‘देवाची इच्छा असेल तर आपण राजकारणाची वाट धरु,’ असे म्हटले होते. ‘आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपण काय करायचे, हे देवच ठरवत असतो. आता देवाला मी अभिनेता म्हणून काम करावे असे वाटते. मी माझी जबाबदारी निभावतो आहे. जर देवाची इच्छा असेल, तर मी उद्या राजकारणात उतरेन. जर मी राजकारणात प्रवेश केला, तर अत्यंत प्रामाणिकपणे काम करेन. पैशांसाठी राजकारणात येणाऱ्यांना मी स्थान देणार नाही. अशा लोकांसोबत काम करण्याची माझी इच्छा नाही,’ असे रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधताना म्हटले होते.