भगवान गौतम बुद्ध यांचे काही पवित्र अवशेष शनिवारी मंगोलिया देशात पाठवण्यात आले आहेत. भगवान गौतम बुद्ध यांचे पवित्र अवशेष भारतीय हवाई दलाच्या ‘आयएल-७६’ (गजराज) या विमानाने शनिवारी दिल्लीवरून मंगोलिया या देशात पाठवण्यात आले आहेत. हे पवित्र अवशेष भारतीय वायुसेनेने मंगोलिया या देशात पोहोचवले आहेत.

दरम्यान, भगवान गौतम बुद्ध यांचे पवित्र अवशेष म्हणजेच बौद्धधातू विशेष बाब म्हणून मंगोलिया देशात पाठवण्यात आले असून त्या ठिकाणी हे बौद्धधातू काही दिवस सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. तसेच हे अवशेष सार्वजनिक प्रदर्शनासाठी मंगोलियामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती भारतीय हवाई दलाने एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत दिली आहे.

भारतीय हवाई दलाने पोस्टमध्ये काय म्हटलं?

“भारतीय हवाई दलाच्या ‘आयएल-७६’ (गजराज) या विमानाने ३० मे रोजी दिल्लीवरून मंगोलियाला भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष हवाई मार्गाने पोहोचवले आहेत. हे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी आणि भारताच्या सभ्यतापूर्ण प्रसाराचं प्रतीक आहे. बौद्ध जगभरात ज्ञान, करुणा आणि प्रबोधनाचे प्रतीक म्हणून पूजनीय असलेले हे पवित्र अवशेष मंगोलियासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. मंगोलियातील हे सार्वजनिक प्रदर्शन बौद्ध धर्माच्या सामायिक वारशाने जोडलेल्या भारत आणि मंगोलिया या दोन राष्ट्रांमधील शतकानुशतके जुने आध्यात्मिक नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. भारतीय हवाई दलाच्या या कृतीतून श्रद्धा, वारसा आणि दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधोरेखित होतात”, असं भारतीय हवाई दलाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हवाई दलाने हे पवित्र अवशेष मंगोलियात पोहोचवले

भारतीय हवाई दलाच्या माहितीनुसार, हवाई दलाच्या ‘आयएल-७६’ या विमानाने ३० मे २०२६ रोजी भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष दिल्लीवरून मंगोलिया या देशात पोहोचवले आहेत. यासाठी भारतीय हवाई दलाच्या ‘आयएल-७६’ या विमानाने रात्रभर उड्डाण केल्यानंतर भारतीय वेळेनुसार ११.२५ वाजता हे विमान मंगोलियात दाखल झालं.

दरम्यान, मैत्रीपूर्ण राष्ट्रांशी सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने भारतीय हवाई दलाने हे अभियान पूर्ण केलं आहे. भारतीय हवाई दलाची ही मोहीम राष्ट्रीय उद्दिष्टांना पाठिंबा देण्याची आणि भारताच्या जागतिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये योगदान देण्याची भारतीय वायुसेनेची क्षमता अधोरेखित करते.