या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत नऊ यात्रेकरू आणि एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला आहे. तसेच सात सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अमरनाथ यात्रेपूर्वी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता केंद्रीय यंत्रणा अॅक्शनमोडमध्ये असून रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीदरम्यान अमित शाह जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा तसेच सद्यस्थितीत तिथे सुरु असलेल्या दहशतवाद विरोधी कारवायांचा आढावा घेणार आहेत. तसेच ते दहशतवाद विरोधी कारवाया आणखी तीव्र करण्यासंदर्भात निर्देश देण्याचीदेखील शक्यता आहे.

हेही वाचा – ३ दिवसांत ३ दहशतवादी हल्ले: जम्मू-काश्मीरमध्ये नक्की काय घडतंय? या हल्ल्यांमागे नक्की कोण?

जम्मू काश्मीरमध्ये या आठवड्यात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. गेल्या रविवारी (९ जून) नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सुरू असताना जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बस दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर ही बस दरीत कोसळली. यात तीन महिलांसह नऊ जण ठार झाले आणि अन्य ३३ जण गंभीर जखमी झाले.

याशिवाय मंगळवारी (११ जून) रात्री जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिस आणि सुरक्षा दलांच्या चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाले. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी कठुआ जिल्ह्यातील सैदा या गावात आणखी एक घटना घडली. दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिस आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान शहीद झाला.

हेही वाचा – जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचाही घेणार आढावा

दरम्यान, यावेळी अमित शाह यावेळी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचादेखील आढावा घेणार असल्याची माहिती आहे. येत्या २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ही यात्रा प्रामुख्याने जम्मू काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम या भागातून जाते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मार्गांच्या सुरक्षेचा आणि या यात्रेच्या नियोजनाचादेखील आढावा घेणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जवळपास ४.२८ लाख लोक या यात्रेत सहभागी झाले. यंदा ही संख्या पाच लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे यंदा सर्व यात्रेकरूंना RFID कार्ड दिले जाण्याचं सांगण्यात येत आहे. या कार्डामुळे त्यांचे रिअल-टाइम लोकेशन जाणून घेणं सोप जाणार आहे. याशिवाय प्रत्येक यात्रेकरूला ५ लाख रुपयांचे विमा संरक्षणदेखील दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या प्रत्येक प्राण्यांनांही ५० हजार रुपयांचं विमा संरक्षणही दिलं जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितलं आहे.