एक्स्प्रेस वृत्त

हैदराबाद : यावेळची लोकसभा निवडणूक ही ‘राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी’ अशी आहे, असे नमूद करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही निवडणूक ‘जिहादला मत विरुद्ध विकासाला मत’ अशीही आहे, असे प्रतिपादन गुरुवारी केले.

तेलंगणातील भोंगीर लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत बोलताना शहा म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीची लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘भारतीय गॅरंटी विरुद्ध राहुल गांधी यांची चिनी गॅरंटी’ अशी आहे. भोगींर या मतदारसंघात येत्या सोमवारी मतदान होणार आहे.

काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि एमआयएम हा एक‘‘तुष्टीकरणाचा त्रिकोण’ असून हे लोक हैदराबाद मुक्ती दिनाचा समारंभ साजरा करण्यास परवानगी देणार नाहीत. हे लोक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध करतात. त्यांना तेलंगणाचा राज्य कारभार शारिया आणि कुराणावर चालवायचा आहे, असा आरोप करत शहा यांनी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांवर हल्लाबोल केला.

हेही वाचा >>>एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; २५ बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचं कंपनीकडून आश्वासन

गेल्या १० वर्षांपासून मोदी देशाचे नेतृत्व करीत आहेत. या काळात त्यांनी कोणतेही आरक्षण संपवलेले नाही. किंबहुना, काँग्रेसनेच एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण पळवून मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिले. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

मोदी नाटक करण्याची शक्यता : राहुल

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून निवडणूक निसटत चालल्याने ते येत्या चार-पाच दिवसांत काहीतरी नाटक करतील, पंरतु तरुणांनी अजिबात विचलित होऊ नये, असा हल्ला काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला. दृकश्राव्य संदेशाद्वारे राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले,‘‘मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे ते काहीतरी नाटक करून विचलित करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही विचलित होऊ नका. बेरोजगारी हा तुमच्यापुढील सर्वांत मोठा प्रश्न आहे.’’