मानकाचर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आसाममधील मानकाचर सेक्टरमधून आसाम- बांगलादेश सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. सोमवारी सकाळी हेलिकॉप्टरने कामाख्या टेकडीच्या शिखरावर उतरलेले शहा यांनी मानकाचरला जाण्यापूर्वी कामाख्या देवीच्या मंदिरात प्रार्थना केली.

सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.गृहमंत्र्यांनी बीएसएफच्या अधिकाऱ्यांसोबत या भेटीनिमित्त उभारलेल्या टेहळणी मनोऱ्यावरून सीमेचे निरीक्षण केले. या भागात जमलेल्या स्थानिक गावकऱ्यांशी ते संवाद साधत असल्याचेही दिसत होते.

भारत व बांगलादेश या दोन्ही देशांच्या सीमेवरील कर्मचाऱ्यांनी या वेळी ध्वजसंचलन केले.

घुसखोरी, पशूंची तस्करी, सीमेवरील कुंपण आणि नदीकाठावरील गस्त यांच्याशी संबंधित मुद्दय़ांवर सहा हे सदरटिला तळावर बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता असल्याचे बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले. आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री सोमवार व मंगळवारी अनेक कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत.