इशरतसंबंधीच्या गहाळ फाइल्सबाबत तपास करण्यासाठी समिती स्थापन

इशरत जहाँ हिच्याशी संबंधित प्रकरणाच्या फाइल्स कुठल्या परिस्थितीत गहाळ झाल्या, याची चौकशी करणार आहेत.

इशरत जहाँ

लष्कर-ए-तोयबाची आत्मघातकी दहशतवादी इशरत जहाँ हिच्या कथित चकमकीतील मृत्यूच्या गहाळ झालेल्या फाइल्सशी संबंधित मुद्दय़ाबाबत अतिरिक्त सचिव बी.के. प्रसाद यांची एक सदस्यीय समिती तपास करणार असल्याचे सरकारने सोमवारी सांगितले.
गृहमंत्रालयात अतिरिक्त सचिव असलेले प्रसाद हे गुजरातमध्ये २००४ साली झालेल्या कथित चकमकीत मारली गेलेली इशरत जहाँ हिच्याशी संबंधित प्रकरणाच्या फाइल्स कुठल्या परिस्थितीत गहाळ झाल्या, याची चौकशी करणार आहेत. या फायली सांभाळून ठेवण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचा, तसेच संबंधित मुद्दय़ांचा ही समिती शोध घेईल, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
अ‍ॅटर्नी जनरलनी पडताळणी करून २००९ साली गुजरात उच्च न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत, तसेच अ‍ॅटर्नी जनरलच्या पडताळणीनंतर बदलण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राचा मसुदा यांचा गृहमंत्रालयातून गहाळ झालेल्या कागदपत्रांमध्ये समावेश आहे.
तत्कालीन गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी तात्कालीन अ‍ॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांना लिहिलेली दोन पत्रे, तसेच प्रतिज्ञापत्राचा मसुदा यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या फाइल्स गहाळ झाल्या असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी १० मार्चला संसदेत सांगितले होते.
पहिले प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र व गुजरात पोलिसांकडून तसेच गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित होते व त्यात मुंबईजवळच्या भागातील १९ वर्षांची एक मुलगी लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी असल्याचे नमूद केले होते. मात्र दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हा भाग वगळण्यात आला, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इशरत ही दहतवादी असल्याचे सिद्ध करणारा कुठलाही निश्चित पुरावा नसल्याचे सांगणाऱ्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्राचा मसुदा तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी तयार केला, असा दावा करण्यात येत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Home ministry begins probe into missing ishrat jahan papers