सोनम रघुवंशीने तिच्याशी लग्न झालेल्या राजाची मधुचंद्राला गेल्यानंतर शिलाँग या ठिकाणी हत्या केली. मे २०२५ मध्ये उघड झालेल्या या बातमीने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणानंतर आता राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारीच ही घटना मानली जाते आहे. एका महिलेने तीन महिन्यांतच तिच्या पतीची हत्या घडवून आणली आहे. ही हत्या नसून अपघात आहे असंही भासवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोक या प्रकरणाला Honeymoon Murder 2.0 असं म्हणत आहेत.
नेमकी घटना काय घडली?
३० जानेवारीला रात्री ९ च्या सुमारास रावला पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनुपगढ मार्गावर आशिष आणि अंजू हे दोघंही जण बेशुद्ध अवस्थेत पडले होते. या दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं, ज्यानंतर डॉक्टरांनी आशिषला मृत घोषित केलं. पत्नी अंजूने पोलिसांना एक कबुली जबाब दिला. त्यात तिने पोलिसांना सांगितलं की अज्ञात वाहनाने आम्हाला दोघांना टक्कर दिली आणि सोन्याचे दागिने लुटून ते लोक फरार झाले. पोलिसांनी सांगितलं की सुरुवातीपासूनच आम्हाला हा साधासुधा अपघात नाही काहीतरी वेगळा प्रकार घडला आहे असा संशय आम्हाला होता. आम्ही घटनास्थळाला भेट दिली तिथेही आम्हाला हे लक्षात आलं की हा नुसता अपघात नाही. त्यानंतर मेडिकल चाचणी आणि फोन रेकॉर्डने समोर आलं प्रकरण
फोन रेकॉर्ड आणि मेडिकल रिपोर्टवरुन काय समोर आलं?
आशिषच्या मृतदेहाबाबत जो वैद्यकीय अहवाल आला त्यात हे समोर आलं की आशिषचा मृत्यू अपघातामुळे नव्हता. तर त्याच्या शरीरावर बेदम मारल्याचे व्रण होते. तसंच त्याचा गळा दाबण्यात आला होता. ज्यामुळे अंजूच्या पतीचा म्हणजेच आशिषचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यूमध्ये आशिषचा मृत्यू झाला हे भासवण्यात आलं. पण अंजूला साधं खरचटलंही नव्हतं त्यामुळे पोलिसांना जो संशय आला तो खरा ठरला कारण हा अपघाती मृत्यू नसून कट रचून केलेली हत्या होती. वैदकीय अहवालातून हे सत्य समोर आलं तर अंजूचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले ज्यात हे समजलं की ती तिचा लग्नाआधीचा प्रियकर संजूच्या सातत्याने संपर्कात होती. संजू हा सादुलशहरचा रहिवासी आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
समोर आलेली सगळी क्रोनोलॉजी काय?
पोलीस तपासात हे समोर आलं की अंजू ही २३ वर्षीय मुलगी तिच्या लग्नामुळे खुश नव्हती. तिने संजू या तिच्या प्रियकरासह मिळून तिच्या पतीचा काटा काढला. अंजू काही दिवसांपूर्वी सादुलशहरला गेली होती. तिथे ती संजू आणि त्याचे दोन मित्र रॉकी आणि बादल यांना भेटली. या सगळ्यांनी मिळून आशिषच्या हत्येचा कट रचला. अंजूला माहीत होतं की आशिष जेवल्यानंतर शतपावली करायला जातो. ठरल्याप्रमाणे अंजू त्याला एका सामसूम रस्त्यावर घेऊन गेली. तिथे आधी त्याची हत्या करण्यात आली आणि मग तो अपघात आहे असं भासवण्यात आलं.

