यंदाच्या वर्षीच्या पद्म पुरस्कारासाठीच्या नावांच्या शिफारशींची यादी फुटली असून काही लोकांनी अनेकांची नावे या पुरस्कारांसाठी सुचवली तर काहींनी आपले नातेवाईक व मित्र यांची या नागरी पुरस्कारांसाठी वर्णी लावण्याचा प्रयत्न केला आहे, असे आरटीआय म्हणजे माहिती अधिकारात देण्यात आलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
गृह मंत्रालयाने आरटीआय कायद्याखाली एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात १३०० जणांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी आल्याचे स्पष्ट झाले आहे त्यात काँग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा, मंत्री राजीव शुक्ला, खासदार सुब्बारामी रेड्डी, भारतरत्न लता मंगेशकर, गायक पंडित जसराज, सरोदवादक उस्ताद अमजद अली खान  यांनी अनेक लोकांची नावे या पुरस्कारांसाठी सुचवल्याचे दिसून येते.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक जसराज यांनी नऊ, राजीव शुक्ला यांनी पाच, मोतीलाल व्होरा यांनी आठ जणांची शिफारस केली होती तर गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दोन नाटय़कलाकारांची शिफारस केली होती तर परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी दोन नावांची शिफारस केली होती तर काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी तीन नावांची शिफारस केली होती.
लता मंगेशकर आणि उस्ताद अमजद अली खान यांनी शिफारस केली असली तरी उषा मंगेशकर, अम्मान, अय्यान यांची नावे पद्म पुरस्कारांच्या यादीत नाहीत असे गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष आगरवाल यांनी असा दावा केला आहे, की पद्म पुरस्कार देताना मोठय़ा प्रमाणात दबावतंत्र वापरले जाते व वैद्यक, व्यापार व उद्योग क्षेत्रात त्याचा वापर जास्त केला जातो कारण त्यामुळे पुरस्कारार्थीना आर्थिक लाभ होतो.
केंद्राला शिफारस करावी म्हणून राज्य सरकारकडे सुमारे ६००च्या आसपास प्रस्ताव सादर झाले. राज्याच्या वतीने ३० ते ३५ नावांची शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
कोणी कोणाची नावे सुचविली?
*लता मंगेशकर : उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, सामाजिक कार्यकर्ते राजमल पारख
*उस्ताद अमजद अली खान : मुलगे अम्मान व अय्यान, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, तबलावादक विजय घाटे, कलादिग्दर्शक सूर्या कृष्णमूर्ती ऊर्फ नटराज कृष्णमूर्ती, सतारवादक नीलाद्रीकुमार.
*सपचे माजी खासदार अमर सिंग :  जयाप्रदा.