प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली़. त्यात अनेक उद्योजकांचाही समावेश असल्याचं दिसत आहे. मात्र या यादीमध्ये दोन नावांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही नाव म्हणजे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई. या दोघांनाही पद्मभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील या दोन्ही दिग्गजांची नावं यंदाच्या १७ पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत आहे. या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर सत्या नाडेला यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त करताना सर्व भारतीयांचे आभार मानलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांनी सत्या नाडेला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “पद्मभूषण पुरस्कार जाहीर होणं आणि एवढ्या विशेष लोकांच्या यादीत आपला समावेश असणं हा फार मोठा सन्मान आहे. मी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीय नागरिकांचा आभारी आहे. तंत्रज्ञानाच्या वापर करुन भविष्यातही भारतीयांना अधिक यश मिळावं यासाठी काम करण्यास मी उत्सुक आहे,” असं सत्या नाडेला यांनी म्हटलंय.

आठ वर्षांपासून सीईओ आणि नुकतेच झाले अध्यक्ष
जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने सत्या नाडेला यांची काही महिन्यांपूर्वीच कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भारतीय वंशाचे नाडेला गेली आठ वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कंपनीने त्यांच्या नेतृत्वातखाली नवीन उंची गाठली आहे. त्यामुळेच मागील वर्षी जून महिन्यात त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. नाडेला यांनी जॉन थॉमसन यांची जागा घेतली आहे. जॉन थॉमसन पुन्हा एकदा लीड इंडिपेंडेंट डायरेक्टरच्या भूमिकेत रुजू झालेत. थॉमसन यांना २०१४ साली अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्याआधी ते कंपनीच्या बोर्डात स्वतंत्र संचालक होते.

कंपनीला नवीन उंचीवर नेलं…
५४ वर्षीय नाडेला यांची २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणुक करण्यात आली होती. जेव्हा त्यांनी हे पद सांभाळले तेव्हा कंपनी समोर मोठ्या प्रमाणात संकटं निर्माण झाली होती. नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ या संकटांतून बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेले. ऑफिस सॉफ्टवेअर फ्रँचायझीला पुनरुज्जीवित करताना क्लाउड कंप्यूटिंग, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपटीहून अधिक वाढली आणि कंपनीची मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचली. नाडेला हे कंपनीचे तिसरे अध्यक्ष आहेत. यापूर्वी या पदावर बिल गेट्स आणि थॉमसन होते.

हैदराबादमध्ये शिक्षण…
सत्या नाडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला आणि सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथेच घेतले. त्यानंतर त्यांनी मनिपाल विद्यापीठातून आयटी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले.१९९२ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. मायक्रोसॉफ्टमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी सन मायक्रोसिस्टममध्ये काम केले होते.
२००० मध्ये मायक्रोसॉफ्ट सेंट्रलचे ते उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट बिझनेस सोल्यूशन्सचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honour to receive padma bhushan microsoft ceo satya nadella scsg
First published on: 28-01-2022 at 07:53 IST