तेल अविव, दुबई, बीजिंग : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मित्रदेशांनी युद्धनौका तैनात करण्याच्या आवाहनाला जवळपास सर्वच देशांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. ‘जे देश मदतीला येणार नाहीत, त्यांना विसरणार नाही,’ या इशार्याचाही काही परिणाम या देशांवर झालेला नाही.
दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराणने सोमवारीही परस्परांवर हल्ले-प्रतिहल्ले केले.
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि इतर देशांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. होर्मुझ सामुद्रधुनीला उद्देशून ट्रम्प सोमवारी म्हणाले, ‘अमेरिकेच्या मदतीला ‘नेटो’ देश आले नाहीत, तर त्यांचे भविष्य अतिशय वाईट असेल.’
ट्रम्प यांच्या आवाहनाला जवळपास सर्व देशांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी युद्धात ब्रिटनच्या सहभागाची शक्यता फेटाळून लावली. जर्मनीनेही होर्मुझची सामुद्रधुनीची कोंडी फोडण्यासाठी इतर कुठल्याही प्रकारे इराण युद्धात सहभाग घेणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘हे आमचे युद्ध नव्हे, आम्ही ते सुरू केलेले नाही,’ असे जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरीस पिस्टोरियस म्हणाले. युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख काजा कल्लास यांनी ‘ट्रम्प यांच्या आवाहनावर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री चर्चा करतील,’ अशी प्रतिक्रिया दिली. ग्रीसनेही कुठल्याही प्रकारच्या सहभागास नकार दिला.
‘पुढील तीन आठवड्यांचे नियोजन’
इराणबरोबरील युद्धााचे पुढील तीन आठवड्यांचे आणि त्यानंतरचेही नियोजन तयार असल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी दिली. इराणमधील सत्ताधारी जितके दुर्बल करता येतील, तितके करू. त्यांची सर्व क्षमता संपवू, असे ते म्हणाले. इराणमधील हजारो ठिकाणांना अद्याप लक्ष्य केलेले नसल्याचे ते म्हणाले.
दुबई विमानतळ तात्पुरते बंद
जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक जेथून होते, त्या दुबई विमानतळाजवळील इंधनसाठ्याला सोमवारी ड्रोननी लक्ष्य केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आग लागली. यामुळे दुबई विमानतळ तात्पुरते बंद होते.
‘शस्त्रसंधीचा कुठलाही प्रस्ताव नाही’
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी चर्चेची शक्यताही पूर्णपणे फेटाळून लावली. इराणने चर्चा किंवा शस्त्रसंधी असा कुठलाही प्रस्ताव ठेवलेला नाही. इराण आणि अमेरिकेच्या जनतेवर लादलेले बेकायदा युद्ध चुकीचे आहे, असे त्यांनी लिहिले.
अन्य घडामोडी
- तेल अविवमधील हवेतल्या हवेत इंधनभरणा सुविधा केंद्र इराणकडून लक्ष्य
- अबूधाबी, बहारिनमधील अमेरिकेचे तळ इराणकडून लक्ष्य
- इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला मोज्तबा खामेनी जिवंत आहेत की नाहीत, याबद्दल माहीत नाही, असे म्हणत ते जिवंत नसल्याचे ट्रम्प यांनी सूचित केले.
