वृत्तसंस्था, दुबई / वॉशिंग्टन
अमेरिका-इराण संघर्ष अधिक तीव्र झाला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी होर्मुझ सामुद्रधुनीत इराणची पुन्हा नाकेबंदी करत टोल लादण्याची घोषणा केली. इराणची जहाजे किंवा त्यांच्या ग्राहकांना या सामुद्रधुनीतून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात येईल. तसेच इतर देशांच्या मालवाहू जहाजांना सुरक्षा पुरविण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून २० टक्के ‘सुरक्षा कर’ आकारण्यात येईल असे ट्रम्प यांनी जाहीर केले.
आतापासून अमेरिका ही होर्मुझ सामुद्रधुनीची रक्षक म्हणून ओळखली जाईल, असा दावाही त्यांनी केला. इराणने ट्रम्प यांच्या घोषणेला तीव्र विरोध करत होर्मुझ हा आमचा प्रदेश असून शत्रूला एक पैशाचाही कर देणार नाही आणि या मार्गावरील नियंत्रणासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू, असा इशारा दिला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर भीषण हल्ले केल्यामुळे संपूर्ण आखातात तणाव वाढला आहे.
पहिल्यांदाच ‘सी-ड्रोन’चा वापर
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रविवारी रात्री इराणच्या ‘बंदर अब्बास’ नौदल तळावर इतिहासामध्ये पहिल्यांदाच ‘कॉर्सेअर’ आत्मघाती ड्रोन बोटींचा वापर करून इराणची पाणबुडी आणि जहाज दुरुस्ती केंद्र उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात इराणचे दोन नागरिक मारले गेले आहेत.
इराणी जहाजे आणि त्यांचे ग्राहक यांनाच नाकेबंदी लागू असेल. इतर सर्व देशांना होर्मुझमधून मुक्त आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध राहील. सामुद्रधुनीतील सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी होणार्या खर्चाची भरपाई म्हणून २० टक्के शुल्क आकारले जाईल. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
