रॉयटर्स, वॉशिंग्टन, दुबई
अमेरिका-इराणमधील युद्धविराम हा ‘स्फोटक’ वळणावर पोहोचला असून, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिकेने इराणची नौदल नाकेबंदीने कोंडी करण्याची घोषणा केली आहे. इराणनेही अमेरिकेला धमकी दिली असून, इराणच्या बंदरांना कुठलाही धोका पोहोचला, तर आखाती देशांतील, ओमानच्या आखातातील बंदरे सुरक्षित राहणार नसल्याचा इशारा इराणने दिला. दरम्यान, अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीच्या घोषणेनंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक ठप्प झाली असली, तरी या सामुद्रधुनीवर इराणने आपला ताबा कायम ठेवला आहे.

इराणच्या बंदरांमधून बाहेर पडणाऱ्या जहाजांना सोमवारपासून अडवण्यास सुरुवात केली जाईल, असा इशारा अमेरिकेच्या लष्कराने दिला. ही नाकेबंदी लागू होण्यापूर्वीच इराणच्या अरौरा आणि न्यू फ्युचर या तेलवाहू जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी सोडली. अमेरिकेच्या प्रादेशिक मध्य कमांडने सोमवारपासून नौदल नाकेबंदी लागू होईल, अशी घोषणा केली. सर्व देशांच्या नौकांना या सामुद्रधुनीत प्रवास करता येणार नाही. ही नाकेबंदी जागतिक हिताची नसल्याचे चीनने म्हटले आहे, तर ब्रिटनने या नाकेबंदीला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. तुर्कीसह युरोपीय देशांनी चिंता व्यक्त केली असून, होर्मुझच्या सामुद्रधुनीत एखादी बचावात्मक मोहीम राबविता येईल का, या बाबत ब्रिटन आणि फ्रान्स या आठवड्यात चर्चा करणार आहेत.

अमेरिकेच्या या कृतीने इराण संतप्त झाला असून, आखाती देशांतील बंदरे सुरक्षित राहणार नसल्याची धमकी इराणनेही दिली आहे. इराणच्या लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय समुद्रात कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालणे बेकायदा असून, त्याला ‘चाचेगिरी’ संबोधण्यात येईल. इराणच्या बंदरांना धोका पोहोचला, तर आखाती देशांतील, ओमानच्या आखातातील कुठलेही बंदर सुरक्षित राहणार नाही. तत्पूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने सांगितले, की होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे कुठलीही नौका आली, तर युद्धविरामाचे उल्लंघन झाल्याचे समजले जाईल. इराणमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, की इराणची बाजू यापूर्वीपेक्षा बळकट झाली आहे. अमेरिकेने अधिक सवलती दिल्या तरच अमेरिकेबरोबर करार करण्यात येईल. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची म्हणाले, ‘चर्चेच्या पटलावर असतानाच अमेरिकेकडून इराणला आतापर्यंत सतत बदलणाऱ्या अटी आणि आता नाकेबंदीचा सामना करावा लागला. अमेरिकेने या साऱ्या प्रसंगांतून काहीच धडे घेतले नसून, चांगल्यातून चांगले आणि शत्रूभावनेतून शत्रुत्वच जन्माला येते.’

तेलाच्या दरात वाढ

अमेरिकेच्या नाकेबंदीच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले आहेत. युरोपमध्ये प्रतिबॅरल दीडशे डॉलरपर्यंत किमती गेल्या असून, युरोपीय देशांनी या किमतींच्या बाबतीत समन्वय ठेवणे गरजेचे आहे, असे युरोपीय संघाच्या उर्सुला वॉन दर लियेन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीच्या घोषणेनंतर तेलाचे दर सोमवारी सात टक्क्यांनी वाढून पुन्हा शंभर डॉलरच्या पुढे गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे जे दर जाहीर होत आहेत, वास्तविक त्यापेक्षाही अधिक पैसे मोजत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली. ही अधिकची रक्कम जवळपास ५० डॉलरपर्यंत आहे. प्रत्यक्ष तेलाच्या दरांमध्ये अधिकृतरीत्या लागली, तर जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिकेतील गॅसोलिनच्या किमती नोव्हेंबरमधील निवडणुकीपर्यंत चढ्याच राहतील, असे विधान रविवारी केले. इराणच्या वतीने वाटाघाटी करणारे मोहम्मद कालिबाफ यांनी अमेरिकेतील गॅसोलिनच्या किमती सामाजिक माध्यमावर टाकल्या आणि कथित नाकेबंदीची मजा लुटा, अशी उपरोधिक टिप्पणी त्याखाली केली.

‘भारताकडून कुठलाही टोल नाही’

नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्गस्थ झालेल्या भारताच्या तेलाच्या टँकरकडून इराणने कुठलाही टोल वसूल केला नाही, असे स्पष्टीकरण इराणचे भारतातील राजदूत मोहंमद फताली यांनी दिले. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या नौकांकडून टोल वसूल करीत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. आम्ही टोल घेतला का, हे तुम्ही भारताला विचारू शकता, असे फताली म्हणाले. या कठीण प्रसंगातही भारत आणि इराणचे संबंध चांगले आहेत. दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परपूरक असल्याचे ते म्हणाले.